Sun, May 31, 2020 16:54होमपेज › Goa › हणजूण येथे पर्यटकाला लुटले; चौघांना अटक

हणजूण येथे पर्यटकाला लुटले; चौघांना अटक

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:36AMम्हापसा  : प्रतिनिधी

कल्याण ठाणे येथील  पर्यटकाला हणजूण येथे  लुटून  त्याचा  मोबाईल, एटीएमकार्ड  काढून घेणार्‍या गिरी येथील संशयित  डेस्मंड सावियो फर्नांडिस (वय 28), इब्राहीम मुक्तगिर (वय 19) व दोन अल्पवयीन मुले अशा चौघांना  हणजूण पोलिसांनी  अटक केली.

हणजूण येथे शनिवारी रात्री 9 च्या सुमारास लुटमारीचा हा प्रकार घडला.   फिर्यादी विक्रांत अनिल रे (कल्याण ठाणे) हा पर्यटक अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून पणजीहून हणजूणाला जात होता.  संशयित   दोन दुचाकीवरून वेर्लाहून हणजूणच्या दिशेेने जात होते. संशयितांनी फिर्यादीला एकटा पाहून त्याच्या समोर दुचाकी नेली व फिर्यादीची दुचाकी लागल्याचा बहाणा करून त्यास अडविले.

फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने संशयितांनी फिर्यादीला म्हापसा येथे कॉपोरेशन बँक एटीएम जवळ आणले. एटीएममधून फिर्यादीने 2 हजार काढून संशयितांना दिले. पैसे घेतल्याबरोबर संशयितांनी फिर्यादीकडील 44 हजारांचे दोन किंमती मोबाईल काढून घेतले. तसेच एटीएम कार्ड आणि एटीएमचा पीन कोड नंबरही धमकावून घेतला.

फिर्यादी विक्रांत खरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच  पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्‍वजित चोडणकर, हवालदार गवंडी, शिपाई विशाल नाईक, सत्येंद्र नास्नोडकर, विशाल मांद्रेकर व विवेक दिवकर या पोलिस पथकाने संशयित   अटक केली व त्यांच्याकडून लुटमार केलेला  सर्व मुद्देमाल व दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन संशयितांची मेरशी येथील अपनाघरात रवानगी केली आहे.