Tue, May 26, 2020 09:26होमपेज › Goa › पणजीत दुकानाबाहेर खरेदीसाठी रांगा

पणजीत दुकानाबाहेर खरेदीसाठी रांगा

Last Updated: Mar 31 2020 10:20PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजीतील  किराणा मालाच्या दुकानांवर मंगळवारी देखील लोकांनी लांब रांगा लावल्या होत्या. मात्र, दूध व भाजीचा पुरवठा सुरळीत झाल्याने तेथील दुकानांच्या बाहेरील रांगा कमी झाल्या आहेत. सरकारने किराणा मालाची दुकाने खुली ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी अजूनही पणजीतील मोजकीच दुकाने खुली आहेत. त्यामुळे जे दुकान खुले आहे तेथे लोक खरेदी करण्यासाठी लांब रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पणजी मार्केटमधील किराणा मालाची काही दुकाने मंगळवारी सकाळी खुली करण्यात आली होती. याशिवाय मार्केटमधील पीठाची गिरण देखील सुरु करण्यात आल्याने काही लोकांनी पीठासाठी दुकानांमध्ये लांब रांगा लावण्याऐवजी थेट गिरणीवर गहू दळून घेण्याचा पर्याय स्वीकारला. पणजी मार्केट सोबतच सांतिनेझ येथील पीठाची गिरण देखील ठरावीक वेळेसाठी सुरु ठेवण्यात आली होती. पणजी मार्केटमधील केवळ बाहेरच्या  दिशेने असलेली किराणा मालाची दुकाने तसेच घाऊक किराणा मालाची दुकाने सुरु होती. मार्केट बंद असल्याने आतील दुकाने व्यवसायिकांना खुली करता आली नाही.

पणजीतील सांतिनेझ, ताळगाव, करंजाळे, कांपाल आदी  भागांतील देखील मोजकीच दुकाने खुली होती. त्यातही बहुतेक दुकानांमधील पीठ, साखर,पोहे व रवा गायब होते. या तिन्ही वस्तूंना मोठी मागणी असल्याने  या वस्तूंचा साठा  येताच तो संपून जात आहे. 

किराणा मालाच्या दुकानांच्या बाहेर लोक सुरक्षित अंतर ठेवत आहेत का, तसेच  मास्कचा वापर केला जात आहे  हे पाहण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.  शहरात दूध तसेच भाजीचा पुरवठा मात्र सुरळीत झाला आहे. सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी  दुधचा नियमित पुरवठा होत असल्याने दुधासाठी सध्या तरी लोकांची  धावपळ होताना दिसून येत नाही. याशिवाय भाजी देखील समाधानकारक  प्रमाणात  उपलब्ध असल्याने भाजी दुकानांच्या बाहेर लोकांच्या रांगा कमी होऊ लागल्या आहेत. 

पणजी मार्केट दुकानदार संघटनेचे पदाधिकारी धर्मेंद्र भगत यांनी सांगितले ,की    पणजी मार्केटमध्ये किराणा मालाचा साठा  येण्यास सुरुवात झाली आहे.  त्यामुळे  ज्या दुकानांमधील साठा  संपला होता त्या दुकानांत माल  दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र  मार्केटमधील सर्वच दुकाने खुली करण्यात आलेली नसून मोजकीच दुकाने खुली आहेत. दुकाने खुली करायची की नाही हा निर्णय पूर्णपणे दुकानदाराचा आहे. त्याच्यावर कसलीही जबरदस्ती करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.