Thu, Jul 02, 2020 15:29होमपेज › Goa › आगरवाड्यात स्पेअर पार्टस् गोदामाला आग; 10 लाखांची हानी

आगरवाड्यात स्पेअर पार्टस् गोदामाला आग; 10 लाखांची हानी

Published On: Sep 16 2019 1:37AM | Last Updated: Sep 17 2019 1:50AM
कोरगाव : वार्ताहर

आगरवाडा चोपडे येथील चंद्रकांत नारायण कोठावळे यांच्या मालकीच्या घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या दुचाकीच्या स्पेअर पार्टस्च्या गोदामाला रविवारी सकाळी 11 वाजता इन्व्हर्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 10 लाख रुपयांची हानी झाली. पेडणे आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या बंबांनी दोन तासांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळवले.

आगरवाडा येथील कोठावळे यांच्या घरात पहिल्या मजल्यावर तीन खोल्यांमध्ये दुचाकीचे स्पेअर पार्टस्, ऑईलच्या बाटल्या होत्या. त्यांना आग लागून पूर्ण सामान जळून खाक झाले. तसेच घराचे छप्परही पूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

स्फोट होऊन आग लागताच त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत घराचा वरचा मजला आगीने व्यापला होता. दलाच्या जवानांनी आगीचे गांभीर्य ओळखून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बरेच सामान जळून खाक झाले होते. आग तळमजल्यावर येण्यापासून जवानांनी रोखून धरली. दोन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणून सुमारे 20 लाखांची मालमत्ता आगीपासून वाचविली.

कोठावळे यांच्या घरातील पुरुष मंडळी नरसोबावाडी तीर्थाला गेली होती. घरात पत्नी व मुलगी होती. स्फोट होताच त्या घाबरून बाहेर आल्या. बाहेरून पाहणार्‍यांनी कुणीतरी पेडणे अग्निशमन दलाला कळवले. पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद गवंडी, विशाल पाटील, अविनाश नाईक, संदेश पेडणेकर तर म्हापसा अग्निशमन दलाचे जवान सुरज शेटगावकर, प्रकाश घाडी, नितेश मयेकर, योगेश आमोणकर आदी जवानांनी आग आटोक्यात आणली.