Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Goa › पणजीत ‘बॉम्बे बझार’च्या गोदामाला भीषण आग

पणजीत ‘बॉम्बे बझार’च्या गोदामाला भीषण आग

Published On: Oct 31 2018 1:48AM | Last Updated: Oct 30 2018 11:50PMपणजी : प्रतिनिधी

येथील 18 जून रस्त्यावरील ‘बॉम्बे बझार’च्या तिसर्‍या मजल्यावरील गोदामाला मंगळवारी रात्री 8.30 वाजता भीषण आग लागली. या आगीत दिवाळीच्या निमित्ताने भरण्यात आलेला रेडिमेड कपडे, पादत्राणे आदींचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. पणजी अग्निशामक दलाचे पाच बंब रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याच्या कामात गुंतले होते. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.

राजधानीतील महत्त्वाचे व्यावसायिक ठिकाण असलेल्या 18 जून रस्त्यावरील मेहता कुटुंबीयांच्या मालकीच्या ‘बॉम्बे बझार’ या मॉलला आग लागली. रात्री 8.30 वाजता मॉल बंद होण्याच्या वेळीच तिसर्‍या मजल्यावर असलेल्या गोदामातून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे दिसू  लागल्यावर आग लागल्याचे समजले. यानंतर सदर बझारच्या मालकाने अग्निशामक  दलाला कळविल्यानंतर तत्काळ दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. दलाच्या जवानांनी दुसर्‍या मजल्यावरील गोदामापर्यंत जाण्यासाठी मोठी शिकस्त करावी लागली. त्यात बंबाची शिडी तोकडी पडू लागल्याने जिन्यावरून जलवाहिनीद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पणजी अग्निशामक दलाची सहा मजल्यांपर्यंत जाणारी ‘एरियल लॅडर’ची सोय असलेला बंब मात्र आणण्यात न आल्याने बघ्यांनी आश्‍चर्य व्यक्त  केले. 

सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता शेजारील दुकानदारांनी व्यक्त केली आहे. सदर आगीची झळ शेजारच्या इमारतीलाही बसण्याची शक्यता असल्याने दलाच्या जवानांना रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दक्ष रहावे लागले.