Mon, May 25, 2020 04:02होमपेज › Goa › गोवा ‘जलसमाधी स्थळ’ म्हणून जगापुढे आणणार का?

गोवा ‘जलसमाधी स्थळ’ म्हणून जगापुढे आणणार का?

Last Updated: Oct 15 2019 1:11AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील किनार्‍यांवर येणार्‍या पर्यटकांना सुरक्षा सेवा पुरविण्यास पर्यटन खात्याला आलेल्या  अपयशामुळे दोघा पर्यटकांचा मृत्यू होऊनही पर्यटन खात्याने सदर दुर्दैवी घटनेबद्दल खेद व्यक्त केला नाही यावरुन सदर खात्याची असंवेदनशीलता दिसून येते.सरकारच्या बेपर्वा कारभारामुळे गोवा हे ‘जलसमाधी स्थळ’ म्हणून जगापुढे आणायचे आहे का, असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्ता डॉ. स्वाती केरकर यांनी पत्रकातून केला आहे. 

राज्यात मागील आठवडाभरात गोव्याच्या समुद्र किना़र्‍यांवर दोन पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनांमुळे किनारे सुरक्षा व जीवरक्षक सुविधांचा गलथान व भोंगळ कारभार सर्वांसमोर उघड झाला. परंतु, पर्यटन मंत्री किंवा सरकाच्या एखाद्या अधिका़र्‍याने त्याविषयी साधी संवेदना सुद्धा व्यक्त केली नाही. या मृत्यूची जबाबदारी घेऊन पर्यटन मंत्री मनोहर(बाबू )आजगावकर यानी त्वरीत राजीनामा द्यावा. अन्यथा पर्यटन खाते भ्रष्टाचाराचे आगर केलेल्या पर्यटन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, अशी मागणी केरकर यांनी केली आहे. 

केरकर म्हणाले, की दोन दिवसांपासून संपावर गेलेल्या ‘दृष्टी लाईफसेव्हींग’ कंपनीच्या जीवरक्षकांनी सदर कंपनीकडून त्यांना मिळणारी अयोग्य वागणूक तसेच त्याना वॉकीटॉकी सारखी उपकरणे सुद्धा देण्यात आली नव्हती, असा गौप्यस्पोट केला आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी मागील विधानसभा अधिवेशनात सदर किनारी सफाई कंत्राटात ’ऑल इज नॉट वेल’ असे सांगून विधानसभेचे लक्ष वेधले होते, ते आता खरे ठरले आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रु. 141 कोटीचे जीवरक्षक सुविधा कंत्राट तसेच रु. 61 कोटीच्या  किनारे स्वच्छता कंत्राटात प्रचंड घोटाळा असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देऊन  चौकशीची मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई न करता मौनव्रत धारण केले आहे.  मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करुन पर्यटन मंत्री तसेच इतर अधिकारी व मंत्र्यांच्या आप्तेष्टांवर कारवाई न केल्यास, आगामी काळात आम्ही पर्यटन खात्यातील एकेक प्रकरण बाहेर काढून सरकारची लक्तरे वेशीवर टांगणार  असल्याचे केरकर यांनी सांगितले.