Wed, May 27, 2020 05:49होमपेज › Goa › सर्वसामांन्यांच्या उत्कर्षासाठी मोदी सरकारच्या योजना फायदेशीर : फडणवीस

सर्वसामांन्यांच्या उत्कर्षासाठी मोदी सरकारच्या योजना फायदेशीर : फडणवीस

Published On: Apr 18 2019 8:28PM | Last Updated: Apr 18 2019 8:28PM
साखळी : प्रतिनिधी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने समाजातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान ऊंचावे यासाठी अनेक सामाजिक योजना राबवल्या. सर्व जाती धर्माच्या गरजू लोकांना त्याचा फायदा झाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस आज भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी एका  दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचारासाठी साखळी येथे आयोजित प्रचार सभेत फडणवीस यांनी मोदी सरकारच्या काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास गंगा पोचल्याचा दावा केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचे औचित्य साधून देशातील गरीबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. मोदी सरकार जेव्हा या योजनेची अंमलबजावणी सुरु करेल त्यावेळी जात, पात, धर्म न पाहता गरजवंताना त्याचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.

फडणवीस म्हणाले, आता स्थानिक निवडणुका नाहीत. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहिल याचा विचार करून मतदान करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या घोटाळ्यांना जनता विटली आहे. मोदी यांनी 5 वर्षात आधुनिक भारत घडवणारे सरकार दिले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणावर टीका करताना फडणवीस म्हणाले, गांधी यांच्या भाषणांमध्ये एक तर मोदी यांच्यावर टीका असते नाहीतर पुचकट विनोद असतात. त्यामुळे लोकांनी त्यांची भाषणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले तर न्याय योजना राबवून गरीबांना दरसाल 72 हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली असली तरी हे पैसे येणार कुठून हे स्पष्ट नसल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येणाऱ्या सरकारची सगळी धोरणे सर्वसामान्य घटक केंद्रीभूत ठेवून आखण्यात आली आहेत. 5 वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारने राबलेल्या सामाजिक योजना देशात आमुलाग्र बदल घडवणाऱ्या असून जनता काँग्रेसच्या फसव्या घोषणांना फसणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.