Wed, Jul 08, 2020 12:35होमपेज › Goa › दोषपूर्ण किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा रद्द करा 

दोषपूर्ण किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा रद्द करा 

Published On: Jul 29 2019 1:17AM | Last Updated: Jul 29 2019 1:34AM
मडगाव ः प्रतिनिधी 

किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा पूर्णपणे चुकीचा आहे. महसूल खात्याच्या अधिसूचनेप्रमाणे राज्यात 175 चौरस किलोमीटर परिसरात खाजन जमिनी व्यापलेल्या आहेत; पण किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यात खाजन जमिनीचे क्षेत्रफळ केवळ 43 चौरस किलोमीटर एवढेच दाखवण्यात आलेले आहे.कृषी खात्यानेसुद्धा हा आराखडा चुकीचा असल्याचे म्हटले असून सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

मडगाव येथील प्रोव्हेदोरियाच्या वृद्धाश्रमात आयोजित ‘इंटरनॅशनल ग्रँड पॅरेंट डे’ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी सरदेसाई बोलत होते. या आराखड्याबाबत लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जनता गोंधळात सापडलेली आहे.राज्यात सरकार स्थिर होते तरी काँग्रेस आमदारांना भाजपात प्रवेश देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असे सरदेसाई म्हणाले. आम्ही या सरकारला पाठिंबा दिला होता. त्या अनुषंगाने गोवा फॉरवर्ड पक्ष केंद्रातील एनडीए सरकारचा एक घटक बनला होता. सध्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकीय समीकरणे बदलली आहेत, पण गोवा फॉरवर्ड आपल्या शब्दावर ठाम असून अजून आम्ही एनडीएशी असलेले नाते तोडलेले नाही, असे सरदेसाई म्हणाले.

राज्यातील या राजकीय परिस्थितीचा केंद्रातील भाजप पक्षश्रेष्ठींनी आढावा घेणे गरजेचे आहे. भाजपचा खोटारडेपणा आता उघडकीला आलेला आहे. सरकार पाडण्याचा कोणीच डाव रचला नव्हता. उलट सरकार घडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता. त्यावेळी प्रमोद सावंत आणि सतीश धोंड हे दोघेही नव्हते, असे सरदेसाई म्हणाले.

किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्याच्या सुनावणीवेळी गोंधळ माजणार, असे आपण अधिवेशनात सूचित केले होते. या आराखड्यात असंख्य चुका आहेत, हे माहिती असतानासुध्दा आराखडा घेऊन लोकांसमोर येणे चुकीचे आहे. मंत्री काब्राल यांनी आपण शूर आहे असे दाखवण्याची कोणतीच आवश्यकता नाही. ते स्वतः लोकांमध्ये जातात हे योग्य नव्हे, असे सरदेसाई म्हणाले.त्यांनी आपल्या अधिकार्‍यांच्या मार्फत किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्याबाबत जनजागृती करणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. लोकांमध्ये गैरसमज पसरवणारे अनेक लोक आहेत त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन या आराखड्याबद्दल त्यांना माहिती देणे आवश्यक आहे. मंत्री काब्राल यांना तीन ठिकाणी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. तिन्ही ठिकाणींच्या सुनावण्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे आता लोकांना विश्वासात घेऊन सरकारला काम करावे लागणार आहे. ज्या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी चर्चमध्ये जाऊन लोकांना वरील आराखड्याबाबत माहिती द्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले.

वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात सरदेसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू प्रदान केल्या. ज्येष्ठांसाठी अनेक मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फादर वालादारीस उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांकडे समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. नगरसेवक ग्लेन आंद्राद यावेळी उपस्थित होते.