Tue, May 26, 2020 06:26होमपेज › Goa › गोव्यातील कामगार संघटनांचा 8 जानेवारीच्या संपात सहभाग

गोव्यातील कामगार संघटनांचा 8 जानेवारीच्या संपात सहभाग

Last Updated: Dec 22 2019 1:17AM
पणजी : प्रतिनिधी

केंद्र  व राज्य  सरकारच्या  कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ 8 जानेवारी 2020 रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात  गोव्यातील  कामगार संघटना  देखील सहभागी होणार असल्याचे आयटकचे  सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी शुक्रवारी पणजीत पत्रकार परिषदेत सांगितले. पणजी बसस्थानक येथील क्रांती सर्कल ते आझाद मैदानापर्यंत   सकाळी 10 वाजता  मोर्चा काढला जाईल. त्यानंतर आझाद मैदानावर जाहीर सभा होईल, असे  त्यांनी  सांगितले.

फोन्सेका म्हणाले, भाजप पक्षाच्या केंद्रात तसेच  विविध राज्यांमध्ये असलेल्या सरकारांकडून कामगारविरोधी धोरणे राबवली जात आहेत.   त्यांच्याकडून  44 कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात आले असून ते कामगार वर्गाला मारक ठरत आहेत.  कामगार वर्गाला गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. सरकारकडून  कामगारांऐवजी भांडवलदारांची पाठराखण केली जात आहे.   सरकारने प्रती दिन वेतन 178 रुपये करुन कामगार वर्गाची एकप्रकारे थट्टा केली असल्यावी टीका त्यांनी  केली.

सरकारने कामगार कायद्यात बदल करुन  पध्दतशीरपणे वेतन आयोग,द्विपक्षीय तोडगे तसेच सामूहिक करारांमध्ये कामगार संघटनांची भूमिक कमजोर केली आहे.  कामगारांना  किमान  वेतन दिले जात नाही.  कामाच्या वेळा वाढवण्यात आल्या  मात्र वेतनात सुधारणा करण्यात आलेली नाही, कामगार संघटना स्थापन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय  कामगारांच्या हिताचे नुकसान करण्यासाठी भविष्य  निर्वाह निधी कायदा व इएसआयसी  कायद्याअंतर्गत  मालकवर्गाने  द्यायचे योगदान देखील कमी केले असल्याचे फोन्सेका यांनी सांगितले.

गोवा कामगार महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अजीतसिंह राणे म्हणाले,  सरकारकडून कामगार वर्गाला गांभिर्याने घेतले जात नाही. सरकार केवळ भांडवलदारांसाठी काम करीत आहे. कामगारांच्या  प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारकडून चुकीचे धोरण राबवले जात  नाही.  त्यामुळेच देशभरातील कामगार वर्गाने आता एकजूटपणा दाखवण्याचा निर्णय घेतला  आहे. त्यानुसार 8 जानेवारी 2020 रोजी  देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात गोव्यातील  कामगार संघटनांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. याला  औद्योगिक कामगारांबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी तसेच कामगार वर्गाचा पाठींबा असे त्यांनी सांगितले.

यावेळी आयटनकचे नेते अ‍ॅड. सुहास नाईक, अ‍ॅड. ह्दयनाथ शिरोडकर, प्रसन्ना उटगी, अशोक बांदेकर, राजेंद्र सावंत, शशिकांत सावंत व अन्य हजर होते.