Tue, May 26, 2020 04:35होमपेज › Goa › काँग्रेसचे जुने गोवेत धरणे 

काँग्रेसचे जुने गोवेत धरणे 

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:10AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर  यांच्या गोव्यातील अनुपस्थितीला शनिवारी   शंभर दिवस पूर्ण झाले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचे शतक पाळण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे जुने गोवे येथील महात्मा गांधी पुतळ्याशेजारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस सदस्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गायिले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत याला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री शंभर दिवस राज्यात नसण्याची देशातील ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकाही होत नाहीत. या आंदोलनाद्वारे गांधींजींकडे गोव्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला नवा मुख्यमंत्री मिळावा, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार टोनी फर्नांडिस म्हणाले की, गोव्याला मागील शंभर दिवसांपासून मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्रिमंत्री सदस्य समिती स्थापन करण्यात आली असली तरी  तिची नेमणूक ही घटनेनुसार नाही. सरकारकडे मान्यतेसाठी जेव्हा प्रस्ताव पाठवले जातात तेव्हा त्यांना तांत्रिक मान्यता मिळते. परंतु, वित्तीय मंजुरी मिळत नाही. कारण मुख्यमंत्री पर्रीकर हे अर्थमंत्री असून तेच गोव्यात अनुपस्थित आहेत. त्यामुळे अनेक  कामे खोळंबली  आहेत.

यावेळी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, अ‍ॅड. रमाकांत खलप, अमरनाथ पणजीकर, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व अन्य  उपस्थित होते.