Mon, May 25, 2020 03:08होमपेज › Goa › भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार

भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार

Published On: Jan 09 2019 2:09AM | Last Updated: Jan 09 2019 12:46AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनसंपर्क अभियान हा अभिनव उपक्रम देशभर सुरू केला असून यामुळे देशातील प्रत्येक राज्यातील घरात काँग्रेसचा बुथ कार्यकर्ता पोहचणार आहे. तळागाळातील लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठीच ही योजना  उपयुक्त ठरणार असून काँग्रेसला लोकांची खरी नस समजणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या खोट्या आश्‍वासनांची सखोल माहिती पत्रकाद्वारे लोकांना दिली जाणार असून भाजपचा खरा चेहरा  उघड होणार आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्य प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी सांगितले.

गोवा प्रदेश काँग्रेसकडून मंगळवारी जनसंपर्क अभियान सुरू  करण्यात आले. या अभियानचे उद्घाटन  पणजीतील जीसीसीआय सभागृहात मंगळवारी  संध्याकाळी 5 वाजता काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

चेल्लाकुमार यांनी आरोग्यमंत्री  विश्‍वजीत राणे यांच्यावर टीकास्त्र सोडताना  सांगितले, की मंत्री राणे यांच्या नुकत्याच व्हायरल  झालेल्या ध्वनिफितीमुळे राफेल विमान करार प्रकरणी भाजप सरकार किती लपवाछपवी करते ते उघड झाले आहे. राफेलवर संसदेत माहिती देण्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. तसेच या टेपबाबत एफआयआर नोंदवण्यास अथवा पोलिस तपास करण्यासही सांगण्यात आले नसल्याने या ध्वनिफितीमधील माहिती सत्य असल्याचे उघड होत आहे. याआधी राणे काँग्रेस सोडून भाजपात सामील झाल्यावर आपल्याला फोनवरून भाजपच्या दडपशाही व हुकुमशाहीबाबत माहिती दिली होती. त्यात भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या भयामुळे आपले कुटुंब आाणि आपण असुरक्षित असून भाजप सोडू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. राणे यांच्या टेपमुळे गोमंतकीयांसमोर भाजपचा खरा चेहरा आला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की भाजप सरकारच्या दीड वर्षाच्या कारकिर्दीनंतर लोकांना सरकारच्या  कामगिरीचा आढावा देण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरू  करण्यात येत आहे. जनतेमध्ये भाजप सरकारच्या नाकर्तेपणा आणि अपयशाची माहिती देऊन त्यांना जागृत केले जाणार आहे.  ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीमुळे देशाचे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असून किरकोळ  व्यापारी नामशेष झाला आहे. पर्रीकर सरकारने राज्यात 50 हजार युवकांना रोजगाराचे आश्‍वासन दिले असून त्यातील 10 हजार युवकांना अजून रोजगार प्राप्त झाला  नाही. राज्यात ‘सेझ’च्या घोटाळ्यामुळे 256 कोटींचा भुर्दंड भाजप सरकारला बसला   असून त्यासाठी कर्ज काढावे लागणार आहे. मासळीत फॉर्मेलिन सारख्या  रसायनाचा अंश आढळल्याने गोमंतकीयांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

खाण प्रश्‍नावर गेल्या 11 महिन्यात कोणतीही उपाययोजना करण्यास भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारला  यश आले नसून लाखो गोमंतकीय बेरोजगार झाले आहेत. जनसंपर्क अभियानसाठी मराठी, कोकणी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतून पत्रके घरोघरी वाटण्यात येणार असून सामान्यांकडून 100 ते 1 हजार रुपयांपर्यंतची देणगीही स्वीकारण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत लोकांना व खास करून युवक - महिलांना काँग्रेस सदस्य होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर  म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेवर येताना जनतेला किती आश्‍वासने दिली, व त्यातील किती आश्‍वासनांची पूर्ती झाली याचा लेखाजोखा काँग्रेस लोकांसमोर मांडणार आहे. चाळीसही मतदारसंघात  घरोघरी जाऊन साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील मागील सात वर्षात भाजप सरकारने काय आश्‍वासने पाळली याची माहिती लोकांना काँग्रेस कार्यकर्ते  देणार आहेत. दर निवडणुकीला भाजप  नेत्यांकडून विविध कल्पना आश्‍वासनरूपाने मांडल्या जातात. त्यातील फसव्या आश्‍वासनांवर  विश्‍वास ठेवून भाजपला मते देणारे मतदार आता पश्‍चाताप करत आहेत.   राज्यात खाणबंदीचा प्रश्‍न सोडवण्यास सरकारला सपशेल अपयश आले असून खाण अवलंबितांना त्यासाठी वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 17 जागा मिळाल्या होत्या, ही संख्या आणखी वाढवून काँग्रेसला बहुमताचे सरकार घडवू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

भाजपमुळेच लोकसेवेची संधी ः राणे

काँग्रेसचे प्रभारी चेल्लाकुमार यांचे चुकीचे आणि खोडसाळ विधान हे खूप विचार करून तयार करण्यात आले आहे. आपण भाजपमध्ये स्वत:च्या मर्जीने सामील झालो असून भाजपकडून कथित धमक्यांमुळे नाही. भाजपा एवढ्या खालच्या पातळीवर कधीच उतरणार नाही, अशी पद्धत फक्त काँग्रेस पक्षातच आहे. भाजप सदाच आपल्या सदस्यांचा आदर करत असून पक्षात कोणालाही धोका संभवत नाही. काँग्रेसमधून आमदार बाहेर पडत असल्याने चेल्लाकुमार यांच्या तोंडातून नैराश्य बाहेर पडत असून भाजपमुळेच आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे उत्तर आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिले आहे.