Mon, May 25, 2020 09:12होमपेज › Goa › काँग्रेसचा भ्रष्टाचारविरोधात ‘जागोर’

काँग्रेसचा भ्रष्टाचारविरोधात ‘जागोर’

Published On: Oct 11 2018 1:17AM | Last Updated: Oct 11 2018 12:30AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण व्यवसाय, कोमुनिदाद, किनारे स्वच्छता कंत्राटे यातील घोटाळा व सरकार, मंत्र्यांकडून होणारा भ्रष्टाचार या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेसने पणजीत बुधवारी मोर्चा काढून व जाहीर सभा घेऊन ‘जागोर’ आंदोलन केले. सरकारकडून होणारे घोटाळे व भ्रष्टाचार थांबला नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असा इशारा विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी आझाद मैदानावर झालेल्या जाहीर सभेत दिला. प्रदेश काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन भ्रष्टाचार विरोधात कारवाई करावी, असे निवेदन सादर केले. निवेदन सादर केल्यानंतर सरकारी खाती व मंत्र्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार थांबला पाहिजे अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कांपालवरून मोर्चा काढला. आझाद मैदानावर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. 
सभेच्या  व्यासपीठावर  काँग्रेसचे गोवा  प्रभारी चेल्लाकुमार, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे, रवी नाईक हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार, फ्रान्सिस्को सार्दिन,  रमाकांत खलप हे माजी खासदार तसेच आमदार नीळकंठ हळर्णकर, फिलिप नेरी रॉड्रिग्स, आंतोनिओ फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड, आग्नेलो फर्नांडिस,   प्रतिमा कुतिन्हो, सैफुल्ला खान व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभेला  सुमारे एक हजार लोकांनी गर्दी केली होती. 

सभेत बोलताना कवळेकर म्हणाले, सरकारकडे पैशांची कमतरता नाही. मात्र, भ्रष्टाचारामुळे जनतेच्या विकासासाठी पैसा कमी पडत आहे. काँग्रेसने अंदाधुंदी न करता शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केले आहे. त्यामुळे सरकारने आता तरी लोकांना गांभीर्याने घ्यावे. अन्यथा, या पुढे जनता गप्प न बसता पोटतिडकीने पुन्हा रस्त्यावर येईल व यापेक्षा मोठे आंदोलन छेडले जाईल. दिगंबर कामत  म्हणाले, तिसर्‍या मांडवी पुलापेक्षा दक्षिण गोव्यात हॉस्पिटलची अधिक आवश्यकता होती. मात्र, सरकारने लोकांची गरज लक्षात न घेताच मांडवी पुलाचे कोट्यवधी रुपयांचे काम हाती घेतले. पणजी स्मार्टसिटीच्या नावाखालीही कोट्यवधी रुपये उधळले जात असल्याचा आरोप कामत यांनी केला. 

रवी नाईक म्हणाले, की सरकारने गोमंतकीयांना फसवले आहे. पाणी, वीज या मूलभूत गरजा देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे.  लोकांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे.
गिरिष चोडणकर म्हणाले, सरकारने भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन प्रकार शोधले आहेत. सरकारी कार्यक्रमांसाठी सरकारी कार्यालये न वापरता खासगी सभागृह वापरून त्यात पैशांचा भ्रष्टाचार सुरू आहे. गरजेचे विषय बाजूला सारून  राजधानीत चार कोटींचे पुतळे बसविण्यात आले आहेत. यावरून सरकारचे  प्राधान्य काय आहे  हे लक्षात येते. आलेक्स रेजिनाल्ड  म्हणाले, प्रादेशिक आराखड्यापासून ते नगर नियोजन पर्यंत सर्व विभागात सरकारचे घोटाळे सुरु आहेत. घोटाळा केला नसेल तर त्यांनी उघडपणे सांगावे, आपण स्वत: त्यांना पुरावा दाखवितो. गेली सात वर्षे सरकार काहीच करू शकले नाही. 

फिलिप नेरी रॉड्रिग्स म्हणाले, सरकारकडुन  राज्यात नियोजनपूर्वक भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारची तिजोरी लुबाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांनी या विरोधात आवाज उठवून काँग्रेसला पाठिंबा द्यावा. 
खलप म्हणाले, सरकारने हजारो लोकांचा विचार न करता  रातोरात खाण व्यवसायावर  बंदी घातली. परंतु, इतके करून यात अडकलेला एक रुपया देखील परत  आणण्यात सरकारला यश आलेले नाही. रोजगार नसल्याने राज्यातील अर्धी जनता  बेकार झालेली आहे. काँग्रेसने सरकारला आवश्यक  सर्व सहकार्य केले. मात्र खाण व्यवसायावर तोडगा काढायला सरकार अपयशी ठरले. 
प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, जनसामान्यांच्या पोटावर सरकार लाथ मारत आहे. सरकार एका हाताने पैसे देऊन दुसर्‍या हातांनी प्रत्येक वस्तूंवरील दर वाढवून पैसे ओरबाडत आहेे.