Wed, May 27, 2020 16:42होमपेज › Goa › केंद्रीय तपास यंत्रणा अमित शहांकडेच; चोडणकर यांची टीका

केंद्रीय तपास यंत्रणा अमित शहांकडेच; चोडणकर यांची टीका

Published On: Jan 04 2019 1:51AM | Last Updated: Jan 04 2019 1:09AM
पणजी : प्रतिनिधी

राफेल करारासंदर्भातील फाईल्सबद्दल मिळालेल्या  ‘ऑडिओ क्‍लीप’ची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील चौकशी करावी, असे विधान आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी  केले आहे.  सदर विधानावरून केंद्रीय तपास यंत्रणा अमित शहा हेच हाताळत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

चोडणकर म्हणाले, राफेल करारासंदर्भात चौकशीसाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री राजनाथ सिंह हे योग्य आहेत. मात्र राणे हे अमित शहा यांच्याकडे चौकशी करावी, अशी मागणी करत आहेत. यावरून भाजपविरोधात जाणार्‍यांची केली जाणारी चौकशी,  ही  तपास यंत्रणांद्वारे राजनाथ सिंह नव्हे तर अमित शहाच हाताळतात हे दिसून येते.  

राफेलसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय आला होता हे उपस्थित सर्व मंत्र्यांना माहिती आहे. राफेलचा विषय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कसा येऊ शकतो, हा मोठा प्रश्‍न आहे. तसेच हा विषय आलाच नव्हता, असे सांगणार्‍या सर्व मंत्र्यांनी ते सिद्ध करण्यासाठी लाय डिटेक्टर चाचणीला स्वत:हून सामोरे जायला हवे होते. त्यावरून सर्व समोर आले असते, असेही चोडणकर म्हणाले.  

सदर ध्वनिफीत ही सिद्धनाथ बुयांव यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत तयार करण्यात आल्याचे भाजपचे म्हणणे आहे. हे खरे असते तर भाजपकडून सर्वात प्रथम बुयांव यांच्या स्टुडिओवर छापा टाकला गेला असता. मात्र, भाजपकडून असे काहीही करण्यात आलेले नाही. तंत्रज्ञान फार पुढारलेले असून त्या ध्वनिफीतीमधील आवाज हा विश्‍वजित राणे यांचा आहे की नाही हे लवकरच समोर येणार आहे.  त्यामुळे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भाजपकडून दिशाभूल केली जात आहे, असेही गिरीश चोडणकर यांनी सांगितले. 

भाजपचा पायाच असत्यावर आधारलेला आहे. यापूर्वी अनेक मंत्र्यांची तब्येत बरी नसल्याची सबब देऊन त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. मग मुख्यमंत्री पर्रीकरांनाच तब्येत बरी नसताना गेले अकरा महिने सूट का दिली जातेय, हे विचार करण्यासारखे आहे. यावरून आम्हाला आधीच माहीत होते की, राफेलसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची कागदपत्रे आहेत, असेही चोडणकर म्हणाले.