Mon, May 25, 2020 10:44होमपेज › Goa › विधानसभा अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहा

विधानसभा अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहा

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्व भाजप आमदारांनी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून कामकाजात भाग घ्यावा.  अधिवेशनच्या कालावधीत लोकांना विधानसभेच्या आवारात बोलवू नये, अशा सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप आमदारांना केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 19 जुलै रोजी सुरू होत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशनाच्या तयारीबाबत भाजप विधीमंडळाची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. विधानसभेत काँग्रेसचे 16 व भाजपचे 14 आमदार आहेत. यामुळे सभागृहातील विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदार हजर होते. तर पाच आमदार गैरहजर  राहिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आणि वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आजारी आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेहून राज्यात आल्यानंतर त्यांनी मंत्री-आमदारांची ही पहिलीच बैठक घेतली. या बैठकीत  भाजप आमदारांना मार्गदर्शन केले. भाजपच्या सर्व आमदारांनी अधिवेशनात शिस्त बाळगून पूर्णवेळ हजर रहावे. विरोधकांच्या प्रश्‍नांना प्रत्येक मंत्र्यांने व्यवस्थित उत्तर द्यावे. अधिवेशनाच्या कालावधीत लोकांची नाहक गर्दी होते ती टाळावी. महत्वाच्या कामाशिवाय कोणालाही विधानसभेतील गॅलरीत बोलावू नये, असे सांगण्यात आले. 

बैठकीनंतर  आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पत्रकारांना सांगितले, अधिवेशनातील कामकाज आणि आमदारांच्या काही प्रश्‍नांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, रोजगार, खाणबंदी अथवा मासळी विक्री आदी प्रश्‍नांवर काहीही चर्चा झाली नाही. 

आमदार ग्लेन टिकलो म्हणाले, की विजेच्या समस्येबद्दल बैठकीत चर्चा झाली. वीज पुरवठ्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले असून त्यांनी वीज खात्याचे सचिव आणि अधिकार्‍यांकडे चर्चा केली आहे.