Mon, May 25, 2020 14:13होमपेज › Goa › फनी वादळाच्या 'चक्री' तडाख्याने काजू पीक ५० टक्‍क्‍यांनी घटणार 

फनी वादळाच्या 'चक्री' तडाख्याने काजू पीक ५० टक्‍क्‍यांनी घटणार 

Published On: May 15 2019 12:12PM | Last Updated: May 15 2019 11:53AM
मडगाव : रतिका नाईक

ओडिशा, आंध्रप्रदेश मध्ये आलेल्या फनी वादळामुळे देशातील काजूचे पीक ५० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. परिणामी त्याचा गोव्यावरही परिणाम झाला असून, गोव्यातही काजूचे पीक घटणार आहे. उत्पादन घटले असले तरी चांगली मागणी असल्याने काजूचे दर तेजीत आहेत. सध्या १२९ रूपये किलो दराने काजू बी खरेदी करण्यात येत आहे. 

काजूच्या विक्रीत वाढ तसेच पावसाळा लांबल्यास मे अखेरपर्यंत काजू दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती गोवा काजु उत्पादक संघटनेचे खजिनदार आणि भारतीय काजू निर्यात समितीचे कार्यकारी सदस्य सिद्धार्थ झांट्ये यांनी दिली.

गोव्यात काणकोण, सांगे, केपे, वाळपई, पर्यें, साखळी आदी जंगलभागात, खासगी आणि सरकारी जागा मिळून सुमारे ३० हजार हेक्टर जमिनीत काजूचे उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षी काजूचे पीक सरासरीपेक्षा १५ टक्के जास्त झाले होते. परंतु यंदाचे काजू पीक गेल्यावर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. तर पावसाची बाधा न येता, येत्या पंधरा ते वीस दिवसात येणारे पीक व्यवस्थित आल्यास नुकसानी भरून येऊ शकते असेही झांट्ये यांनी सांगितले. 

याशिवाय फनी वादळामुळे गोवा कारखानदारांना ओडिशा, आंध्रप्रदेशमधून काजू घेता येत नसल्याने कारखानदार परदेशातून काजू आयात करण्यावर भर देत आहेत असेही झांट्ये यांनी सांगितले. 

गोव्यात काजूची तीन पीके घेतली जातात. सुरवातीला मार्चमध्ये चांगले पीक आले होते, पण एप्रिलमध्ये आलेल्या पिकांमध्ये घट झाल्याने शेतकऱ्यांना गेल्यावर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी नुकसान सोसावे लागले. त्यामुळे बाजारात ११८ रुपये किलो दराने काजू बीची विक्री होत होती. आता दर वाढले तरी दरम्यान झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकरी मे महिन्यात येणाऱ्या तिसऱ्या पिकावर अवलंबून आहेत. काजूच्या पिकाला उष्णतेची आवश्यकता असल्याने जितका पावसाळा उशिरा सुरू होईल तितका शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असे काजूचे गणित असल्याचे शेतकरी नोरोन्हा यांनी सांगितले.