Sat, Aug 24, 2019 10:07होमपेज › Goa › घोगळात कारची झाडाला धडक; युवक ठार, दोघे गंभीर

घोगळात कारची झाडाला धडक; युवक ठार, दोघे गंभीर

Published On: Dec 31 2018 1:49AM | Last Updated: Dec 31 2018 1:49AM
मडगाव : प्रतिनिधी

हडफडे येथून संगीताचा  कार्यक्रम आटोपून घरी परतताना कारने झाडाला धडक दिल्याने कोलवा येथील  कारचालक ब्रायज फेर्नांडिस (वय 20) या युवकाचा मृत्यू झाल्याची  घटना घोगळ येथे शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात जोश्वा वाझ (18), न्यूमन परेरा (20) आणि क्लिटंन मार्टिन्स (25) हे तिघे जखमी  झाले आहेत.जोश्वा आणि क्लिटंन या दोघांची  स्थिती गंभीर असल्याने त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  क्लिटंन मार्टीन्स हा वार्का येथील न्यूसेन पेरेरा हा कोलवा येथील तर जोश्वा हा रावणफोंड येथील राहणारा आहे.सध्या न्यूसेन यांच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहेत. जोश्वा आणि क्लिटंन हे दोघे संगीतकार असून उत्तर गोव्यातील हडफडे येथे बँड शोचा कार्यक्रम आटोपून हे चौघेही घराकडे परतत होते. जुने वर्ष सरण्यास एक दिवस उरला असताना या अपघाताच्या घटनेमुळे कोलवा परिसरात शोककळा पसरली आहे.

फातोर्डा पोलिस उपनिरीक्षक फ्रान्सिस झेवियर यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री हडफडे येथे बँण्ड शो होता. हा कार्यक्रम आटोपून जी ए 08 ए 5375 क्रमांकाच्या एस्सेन्ट कारमधून हे चारहीजण मडगावला येत होते. जोश्वा हा रावणफोंड येथे रहात असल्याने त्याला घरी पोचविण्यासाठी बगल रस्त्यातून जात असताना चालक ब्रायज याचा वाहनावरील ताबा निसटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. अपघात घडला तेव्हा तेथून जाणार्‍या एकाने त्वरित फातोर्डा पोलिसांना अपघाताविषयी माहिती दिली. 

फातोर्डा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फ्रान्सिस झेवियर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ताबडतोब मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ब्रायज फर्नांडिस याला मृत घोषित केले. जोश्वा व क्लिटंनची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. भा.दं.सं.च्या 279, 338 व 304 (अ) कलमाखाली पोलिसांनी वरील अपघात  प्रकरणाची नोंद केली आहे. चालक मृत ब्रायज फेर्नांडिस याच्याविरोधात या अपघातप्रकरणी गुन्हा नोंदविला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.