Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Goa › सख्ख्या भावाचा धाकट्या भावावर गोळीबार

सख्ख्या भावाचा धाकट्या भावावर गोळीबार

Published On: Dec 16 2018 1:35AM | Last Updated: Dec 16 2018 1:35AM
फोंडा :  प्रतिनिधी 

जमीन मालमत्तेच्या कौटुंबिक वादातून गोकुळदास पांडुरंग डांगी (वय 58, रा. शांतिनगर-फोंडा) याने धाकटा भाऊ  शरद डांगी (48, शांतीनगर) याच्यावर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडण्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. गोळी लागल्याने शरद जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. दरम्यान, संशयित गोकुळदास डांगी याला पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतिनगर-फोंडा येथे सकाळी गोकुळदास हा नारळ पाडण्यासाठी पाडेलीला घेऊन आला होता. पाडेलीला आणल्याची माहिती गोकुळदास याचा धाकटा भाऊ शरद याला समजल्यानंतर त्याने गोकुळदासला जाब विचारला. डांगी कुटुंबीयांचा जमिनीवरून सध्या वाद सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर नारळ पाडण्याच्या प्रकारामुळे गोकुळदास  व शरद यांच्यात बाचाबाची झाली. एकमेकांना जाब विचारल्यानंतर आरडाओरड सुरू झाली. त्यातच प्रकरण हातघाईवर आले. शरद डांगीने गोकुळदास यांच्यावर दगड फेकून मारला. त्यानंतर चिडलेल्या गोकुळदासने शरदवर रिव्हॉल्वरने गोळी झाडली. शरदच्या छातीच्या खाली उजव्या बाजूला गोळी लागल्याने तो खाली कोसळला. यावेळी अन्य डांगी बंधू धावत घटनास्थळी आले आणि त्यानंतर लगेच त्याला फोंडा आयडी इस्पितळ व तेथून गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. शरदची प्रकृती गंभीर  बनल्याने त्याच्यावर बांबोळी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
दरम्यान, भांडणात जखमी झालेल्या गोकुळदास यांच्यावरही फोंडा आयडी इस्पितळात उपचार करून चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळी झाडलेले रिव्हॉल्वर अद्याप सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित गोकुळदास डांगी याच्याविरुद्ध कलम 307  तसेच शस्त्रास्त्र कायद्यान्वये  गुन्हा नोंदवला असून पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये पुढील तपास करीत आहेत. 

रागाच्या भरात झाडली गोळी
शांतीनगर-फोंडा येथील डांगी बंधूंमध्ये जमीन मालमत्तेवरून काही वर्षांपासून वाद सुरू आहे. पांडुरंग डांगी यांना चार मुलगे असून त्यातील गोकुळदास हा क्रमांक दोनचा मुलगा आहे, तर शरद धाकटा आहे. गोकुळदासने स्वतःची स्वतंत्र इमारत बांधली आहे. तर शरद हा अविवाहित असून तो दुसर्‍या भावाकडे राहतो. घराजवळच माड आहेत, आणि माडावरील नारळ पाडण्यासाठी गोकुळदास आला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर भावानेच भावावर रागाच्या भरात गोळी झाडण्याचा प्रकार घडला.