Wed, May 27, 2020 16:56होमपेज › Goa › प्रदेश भाजपचे उत्पल यांना प्रचारात सहभागाचे निर्देश

प्रदेश भाजपचे उत्पल यांना प्रचारात सहभागाचे निर्देश

Published On: Apr 12 2019 2:03AM | Last Updated: Apr 12 2019 12:12AM
पणजी : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना प्रदेश भाजपने लोकसभेचे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या पणजीतील प्रचार मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या वृत्ताला दुजोरा देऊन आपण श्रीपाद नाईक यांच्या प्रचाराला मदत करणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी गुरूवारी सांगितले. भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी  नुकतीच उत्पल पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांचे राजकारणातील प्रवेशाविषयी मत जाणून घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात आता भाजपने उत्पल पर्रीकर यांना 

लोकसभेच्या पणजी शहरातील प्रचार मोहिमेत सहभागी होण्यास  सांगितल्यामुळे पणजीच्या पोटनिवडणुकीत  उत्पल पर्रीकर यांनाच भाजपची उमेदवारी मिळण्याबाबतचे संकेत दिले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उमेदवारीविषयी उत्पल पर्रीकर यांनी काहीही स्पष्ट सांगण्यास नकार दिला असला तरी ते म्हणाले की, भाजपने आपल्याला लोकसभेच्या प्रचारात सक्रीय होण्यास सांगितले असल्याने आपण भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा पणजी मतदारसंघात प्रचार करणार आहे. 

भाजप कार्यकर्त्यांकडून उत्पल पर्रीकर यांनाच पणजी पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी द्यावी, अशी मागणी वाढत आहे. सोशल मीडियावरही तशी चर्चा सुरू असून अनेकांनी उत्पल पर्रीकर यांनाच उमेदवार म्हणून पसंती दिली असल्याचे आढळून येत आहे. 

उत्पल यांना हक्कच : विजय सरदेसाई

पणजी पोटनिवडणुकीसंबंधी बाबूश मोन्सेरात आपल्याला भेटले असून त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. राजकारणात प्रत्येक पाऊल विचार करून टाकण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजप सरकारचा घटक असून पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत भाग घेण्याचा कोणताही विचार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा  पर्रीकर यांच्या कुटुंबीयांनी आणि भाजपनेच पुढे नेण्याची गरज आहे.  उत्पल पणजी पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक असतील आणि भाजपचा त्यांना पाठिंबा असेल, तर त्यांना भाईंचा वारसा पुढे चालवण्याचा नैसर्गिक हक्क  आहे, असेही सरदेसाई म्हणाले.