Mon, May 25, 2020 11:25होमपेज › Goa › म्हापशात भाजपचाच झेंडा : पार्सेकर

म्हापशात भाजपचाच झेंडा : पार्सेकर

Published On: Apr 26 2019 1:49AM | Last Updated: Apr 26 2019 1:49AM
पणजी : प्रतिनिधी

मांद्रे मतदारसंघाच्या प्रचारकार्यापासून आपण अलिप्त राहिलो होतो. यामुळे आपण मांद्रेच्या निवडणुकीबद्दल काहीही सांगू शकत नाही. मात्र म्हापशाचा भाजपचा उमेदवार जोशुआ डिसोझा ही पोटनिवडणूक जिंकणार, असा आपल्याला विश्‍वास असल्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. 

पार्सेकर यांनी मांद्रे पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला नव्हता. मांद्रेतील भाजपच्या कार्यकर्त्यांना   हव्या त्या उमेदवाराला मतदान करावे, अशी मोकळीक पार्सेकर यांनी निवडणुकीआधी दिली होती. पार्सेकर यांनी म्हापसा पोटनिवडणूक प्रचारात सक्रिय राहून विविध सभा व मेळाव्यांना उपस्थिती लावली होती.

पार्सेकर म्हणाले, की भाजपला लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्व ठिकाणी भाजपचेच उमेदवार विजयी होणार आहेत.  लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघात खासदार श्रीपाद नाईक हेच पुन्हा विजयी होणार आहेत. मात्र गत लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या मताधिक्यात यंदा घट होईल,असे आपल्याला वाटते. पोटनिवडणुकीत   म्हापसा मतदारसंघात प्रचारकार्य   केले असल्याने तिथे भाजपचे डिसोझा हेच जिंकणार असल्याचे आपण सांगू शकतो. 

 पक्षावरील  नाराजीमुळे मांद्रेत आपण अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, कार्यकर्त्यांसह पक्षातील सहकार्‍यांचे म्हणणे समजून घेतल्यानंतर आपण भाजपचे पक्षकार्य न सोडण्याचा निर्णय घेतला.   हे कोणत्या कारणामुळे झाले, ते सर्वांना माहीत आहे. अपक्ष म्हणून मांद्रेची पोटनिवडणूक न लढवता अलिप्त राहणे आपण अधिक पसंत  केले. मांद्रेत आपण निवडणुकीपासून अलिप्त राहून   आराम करणे पसंत केले,असे त्यांनी सांगितले.