Thu, Jul 02, 2020 13:51होमपेज › Goa › सुशोभिकरणासाठी ४० माडांची कत्तल

सुशोभिकरणासाठी ४० माडांची कत्तल

Published On: Jul 01 2019 1:11AM | Last Updated: Jul 01 2019 12:01AM
मडगाव : प्रतिनिधी 

सुखोभाट-सुरावली येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्यानजीकचे चाळीस माड एका रात्रीत कापून टाकण्यात आल्याचे रविवारी सकळी उघडकीस आले. या घटनेने सासष्टीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकाराची उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी, अन्यथा लोक रस्त्यावर येतील, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने कार्मो फर्नांडिस यांनी दिला आहे.

सुखोभाट येथील मुख्य रस्त्यालगत असलेले माड कापले जात असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. हे माड वन खात्याकडून कापले जात होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांनी येथे प्रस्तावित सुशोभीकरणाला विरोध केला होता.पण रविवार असल्याची संधी साधून हे कृत्य करण्यात आले. स्थानिक लोकांनी पत्रकारांना या ठिकाणी बोलावले असता पत्रकारांना पाहून अधिकार्‍यांनी धूम ठोकल्याचा दावा लोकांनी केला आहे. कार्मो फर्नांडिस यांनी या विषयी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुशोभीकरणासाठी माड कापण्याची कोणतीच आवश्यकता नव्हती. माड ठेवूनसुध्दा सुशोभिकरण करता आले असते. पण काही जणांनी सकाळी याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने माड कापून टाकणे सुरू केले होते. लोकांनी आक्षेप घेताच काम सोडून त्यांनी पलायन केले.

वन खात्याचे दोन अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. स्थानिकांनी त्यांना प्रश्न विचारले असता माड कापण्याची परवानगी घेतल्याचे त्यांच्याकडून स्थानिकांना सांगण्यात आले, अशी माहिती कार्मो फर्नांडिस यांनी दिली. आपण स्थानिक सरपंचांना विचारले होते पण त्यांनाही याबद्दल काहीच माहिती नाही. चाळीस माडांबरोबर कितीतरी झाडे कापून टाकण्यात आली आहेत. वन खात्याचे काम झाडे लावण्याचे आहे पण इथे मात्र वन खाते स्वतःच झाडे कापत असल्याचे ते म्हणाले.

मडगावचे वनरक्षक सिद्धेश गावडे यांना विचारले असता सुरावली ते बाणावलीपर्यंत एकूण नव्वद झाडे कापण्यासाठी जलस्त्रोत खात्याला परवानगी देण्यात आलेली आहे. जे चाळीस माड कापण्यात आले आहेत हे त्याच सर्व्हे क्रमांकाचा एक भाग आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जलस्त्रोत खाते बाणावलीपर्यंत सदर रस्त्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणार आहे.त्यासाठी त्यांना खात्याने एनओसी दिलेली आहे, असे ते म्हणाले.