Wed, Jul 08, 2020 12:57होमपेज › Goa › बायंगिणी कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

बायंगिणी कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

Published On: Jul 21 2019 1:23AM | Last Updated: Jul 21 2019 1:23AM
पणजी ः प्रतिनिधी

जुने गोवे बांयगिणी येथे होणार्‍या कचरा प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा प्रखर विरोध असून या प्रकल्पाविरोधात रविवारी (दि.21) जुने गोवे येथील गांधी चौकात निदर्शने केली जाणार आहेत. त्याचबरोबर सकाळी जुने गोवे ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात येणार असून कचरा प्रकल्पाविरोधात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या कचरा प्रकल्पाविरोधात प्रसंगी न्यायालयातही जाऊ, असा इशारा पोरने गोंयचो नागरिक मंचाचे डॉ. अरविंद कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जुने गोवे भागात येणारा कचरा प्रकल्प हा येथील लोकांसाठी हानिकारक ठरणार आहे. बायंगिणीला दुसर्‍या सोनसडो व साळगावचे रूप आम्हाला द्यायचे नाही. या कचरा प्रकल्पाला स्थानिक आणि कुंभारजुवे मतदारसंघातील सर्व रहिवाशांचा विरोध आहे. हा प्रकल्प बायंगिणीत होऊ देणार नाहीच, गरज पडल्यास कुंभारजुवे मतदारसंघातील लोकांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असे सांगून आज दुपारी 3 वाजता गांधी चौकात प्रकल्पाविरोधात निदर्शने करण्यात येतील, असे कुमार यांनी सांगितले. 

राजेश फळदेसाई म्हणाले, न्यायालयात किंवा राष्ट्रीय हरित लवादाकडे या कचरा प्रकल्पाविरोधात तक्रार दाखल करण्याची आमची तयारी आहे. या संदर्भात कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांची रहिवाशांनी भेट घेतली असून येत्या 28 जुलै रोजी या प्रकल्पासंबंधी जनसुनावणी होणार आहे. त्यात लोकांनी प्रकल्पावर समस्या मांडाव्यात तसेच सप्टेंबर महिन्यात या प्रकल्पाची सुरूवात केली जाणार असल्याचे लोबो यांनी सांगितल्याचे फळदेसाई म्हणाले. 

अंबर आमोणकर म्हणाले, या प्रकल्पासाठी 2006 मध्ये जमीन संपादित करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांनी प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता. सरकार आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करू पाहत असून आम्ही प्रकल्प होऊ देणार नाही. 

कचरा प्रकल्प येणार असल्याची माहिती असूनदेखील नगरनियोजन खात्याने प्रकल्पाच्या आजूबाजूला 5 ते 6 हजार फ्लॅट्स असलेल्या इमारतींना परवानगी दिली आहे. कचरा प्रकल्प उभारताना आजूबाजूला लोकवस्ती असलेला परिसर कसा निवडण्यात आला? तसेच कचरा प्रकल्प हा एखाद्या पडीक जमिनीत उभारायला हवा हे सरकारच्या लक्षात त्यावेळी कसे आले नाही, असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले. 

जुने गोवे हे वारसा व पर्यटनस्थळ असून या ठिकाणी दिवसाला हजारो पर्यटक येतात. प्रकल्प आल्यास या भागात दुर्गंधी पसरणार आहे. कचरा प्रकल्प उभारण्यापूर्वी झाडे लावून हरित परिसर तयार केला जातो. तसेच नागरिक, पंचायत, पालिकांना कचरा वेगळा काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, असे काहीच न करता हा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारची तयारी सुरू आहे, असे ते म्हणाले.

अंकिता नार्वेकर म्हणाल्या, कदंब पठारावर पाण्याची समस्या आहे. अशावेळी ही समस्या सोडविण्याचे सोडून कचर्‍याचे ढिगारे येथे टाकण्याचा उद्योग केला जात आहे. यामुळे आहे ते पाणीदेखील दूषीत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. पत्रकार परिषदेत ग्लेन काब्राल, मारियानो फेरांव व अन्य उपस्थित होते.