Thu, Jul 02, 2020 15:11होमपेज › Goa › वास्कोत पोलिस उपनिरीक्षकावर कुर्‍हाडीने वार; चौघांना अटक

वास्कोत पोलिस उपनिरीक्षकावर कुर्‍हाडीने वार; चौघांना अटक

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:37AMदाबोळी ः प्रतिनिधी

नौदलाच्या हद्दीत आग लावल्याप्रकरणी दोरादो कुटुंबीयांविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत यांच्यावर कुर्‍हाडीने  वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.21) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीमवेळ (वास्को-मांगोर) येथे समुद्र किनार्‍यावर घडली. या प्रकरणी  इनासियो दोरादो (वय 64), सुकेरिना दोरादो (34), जुझे (38)आणि मिखाईल दोरादो (60, सर्व रा. मांगोर) या चौघांना अटक केली. जखमी भगत यांच्यावर गोमेकॉत शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचार सुरू आहेत.

पोलिस निरीक्षक नालास्को रापोज  यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री नौदल पोलिसांकडून त्यांच्या हद्दीत आग लागल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर  अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. नौदलाने दोरादो कुटुंबीयांनी सदर आग लावल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. तक्रारीस अनुसरून पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत सहकार्‍यांसमवेत भीमवेळ (वास्को-मांगोर) येथे दोरादो कुटुंबीयांना अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोरादो कुटुंबीय आणि उपनिरीक्षक प्रशांत भगत यांच्यात बराचवेळ बाचाबाची झाली. त्यानंतर काही कळण्याआधी घरातील कुर्‍हाडीने इनासियो दोरादो याने  भगत यांच्या मानेवर  वार केला.हा वार चुकवताना भगत यांच्या उजव्या हाताची दोन बोटे छाटली गेली तसेच हाताला गंभीर इजा झाली. दरम्यान, उपस्थित अन्य पोलिसांनी दोरादो कुटुंबीयांना पकडून अटक केली.  जखमी भगत यांना प्रारंभी चिखली आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, जखम गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना तातडीने गोमेकॉ इस्पितळात हलवण्यात आले. रविवारी (दि.22) पहाटे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.