Wed, May 27, 2020 12:37होमपेज › Goa › नाफ्ता जहाज कप्तानाच्या अटकेचे आदेश

नाफ्ता जहाज कप्तानाच्या अटकेचे आदेश

Last Updated: Oct 27 2019 12:29AM
पणजी : प्रतिनिधी

धोकादायक नाफ्ता रसायनाने भरलेले टँकर जहाज दोनापावला पासून सुमारे दोन सागरी मैलावर समुद्रात खडकांवर अडकले आहे. सदर जहाजाचा कप्तान आणि मालकाला पाचारण करण्यात आले असून कप्तानाला न्यायालयीन अटक करण्याचा आदेश दिला आहे. मुरगाव पत्तन न्यास (एमपीटी) आणि कप्तानाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासही सांगितले आहे. सध्या तरी या जहाजाचा राज्याला कसलाही धोका नसून लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केले.

आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर  मुख्यमंत्री सावंत यांनी बंदर कप्तान, एमपीटी, तटरक्षक  दल,  दोन्ही  जिल्हाधिकारी, आपत्कालीन यंत्रणेचे अधिकारी व अन्य अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, की सुमारे 3 हजार मेट्रिक टन नाफ्ताने भरलेल्या या जहाजावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ते भरकटत दोनापावला समुद्र परिसरात आले आहे. सध्या हे जहाज दोनापावलापासून सुमारे 2.5 सागरी मैल अंतरावर खडकावर स्थिरावले असून त्याच्या हालचालीवर सतत नजर ठेवली जात आहे. 

या जहाजावरील नाफ्ता दुसर्‍या जहाजावर स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जहाज मागवण्यात आले असून ते रविवारी दाखल होणार आहे. समुद्रात खडकावर अडकलेल्या  जहाजाबाबत एमपीटीचा निष्काळजीपणा उघड झाला असून त्यांच्या अधिकार्‍यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आपण आदेश दिले आहे. या जहाजाच्या कप्तानाला शुक्रवारी पणजीत बोलावण्यात आले होते.  जहाजावरील मालाची आणि अन्य यंत्रणेची तपशीलवार माहिती त्याच्याकडून घेतली गेली आहे. सदर जहाजाचा कप्तान  आणि  मालकाला पुन्हा पाचारण करण्यात येणार आहे.एमपीटीने सदर जहाज हलविण्याबाबत सर्व ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.  

बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो म्हणाले, की आपल्याला सदर जहाजाची कल्पना आणि त्यावरील धोकादायक नाफ्त्याची माहिती काही महिन्यापूर्वी मिळाली होती. त्यावेळी सदर जहाज एमपीटीच्या अधिकारक्षेत्रात असल्याने सरकारने कोणतीही कृती केली नव्हती.