Thu, Jul 02, 2020 14:29होमपेज › Goa › ‘हॉस्पिसियो’ला डेंग्यूचा विळखा!

‘हॉस्पिसियो’ला डेंग्यूचा विळखा!

Last Updated: Oct 23 2019 1:24AM
मडगाव : प्रतिनिधी 
हॉस्पिसियो इस्पितळात काम करणार्‍या सुरक्षारक्षकांना डेंग्यूची लागण होण्याचा प्रकार ताजा असताना आता हॉस्पिसियोतील 23 परिचारिका आणि एका डॉक्टरला सुद्धा डेंग्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हॉस्पिसियोच्या प्रशासनाकडून या प्रकाराविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 23 पैकी दहा परिचारिका उपचार घेऊन पुन्हा कामावर रूजू झालेल्या आहेत.

हॉस्पिसियोत याबाबत विचारणा केली असता कर्मचार्‍यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. काही कर्मचार्‍यांनी आपले नाव उघड न करण्याच्य अटीवर बोलताना हॉस्पिसियोतील एका पूर्ण वेळ डॉक्टरवर डेंग्यूचे उपचार सुरू आहेत, अशी माहिती दिली. सध्या त्या डॉक्टरची प्रकृती सुधारत आहे. त्याचबरोबर तेरा परिचारिकासुद्धा डेंग्यूवर उपचार घेत आहेत. लोकांना उपचार देणार्‍या हॉस्पिसियोच्या कर्मचार्‍यांना डेंग्यू झाल्याने सध्या हा मडगावात चर्चेचा विषय बनलेला आहे.

गेल्या महिन्याभरापासून हॉस्पिसियोत डेंग्यूने थैमान घातले आहे. यापूर्वी हॉस्पिसियोमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍याला डेंग्यू झाला होता. त्याशिवाय चार सुरक्षारक्षकांना सुद्धा डेंग्यू झाला होता. गेल्या आठवड्यात एकूण 23 परिचारिका डेंग्यूमुळे आजारी झाल्या होत्या. याविषयी हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांना विचारले असता 23 पैकी दहा परिचारिका उपचार घेऊन पुन्हा कामावर रुजू झालेल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. एका डॉक्टरला डेंग्यू झाला होता; पण आता तोही पूर्ण पणे बरा झालेला आर्हेें अशी माहिती त्यांनी दिली.

हॉस्पिसियोत विचारणा केली असता मेडिसिन वार्डमध्ये  डेंग्यूचे 5  रुग्ण भरती आहेत, अशी माहिती त्यानी दिली. सध्या हॉस्पिसियोत डेंग्युचे रुग्ण सापडू लागल्याने हॉस्पिसियो पुन्हा चर्चेत आले आहे. ग्रामीण आरोग्य केंद्राशी संपर्क साधला असता दर आठवड्यात हॉस्पिसियोच्या सभोवताली औषधाची फवारणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.हॉस्पिसियोच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश हेगडे यांना विचारले असता गेल्या महिन्याच्य तुलनेत यावेळी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे असे ते म्हणाले. आरोग्य खात्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली आहेत.योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

मडगावात डेंग्यूचे थैमान

मडगाव शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. उपचारासाठी लोक हॉस्पिसियोत दाखल होत होते पण आता हॉस्पिसियोतील खुद्द कर्मचारीच डेंग्यूच्या साथीला बळी पडल्याने आता उपचारासाठी कोठे जावे, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. हॉस्पिसियो इस्पितळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव झालेला आहे.  त्यातून खुद्द डॉक्टरसुद्धा सुटलेले नाहीत. सध्या परिचारिकाबरोबर एक डॉक्टरसुद्धा डेंग्यूचा उपचार घेत आहे.