Wed, May 27, 2020 04:39होमपेज › Goa › आजगावकर, पाऊसकरांविरुद्ध ‘मगो’ची अपात्रता याचिका

आजगावकर, पाऊसकरांविरुद्ध ‘मगो’ची अपात्रता याचिका

Published On: May 04 2019 1:14AM | Last Updated: May 04 2019 1:42AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून (मगोप) भाजपात प्रवेश केलेले उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांच्याविरुद्ध हंगामी सभापती मायकल लोबो यांच्याकडे ‘मगो’चे नेते सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी अपात्रता याचिका दाखल केली. 

‘मगो’च्या तत्कालीन दोन्ही आमदारांनी घटनेची पायमल्ली करून भाजपात प्रवेश केला असल्याचा दावा ‘मगो’ नेते सुदिन ढवळीकर यांनी या याचिकेत केला आहे. आजगावकर आणि पाऊसकर यांनी ‘मगो’तून बाहेर पडून 27 मार्च 2019 रोजी मध्यरात्रीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी दोघांचाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा उपमुख्यमंत्री असलेले सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्या जागी पाऊसकर यांना त्यांचे खाते देण्यात आले होते. 

‘मगो’ पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले की, ‘मगो’चे आमदार असलेले आजगावकर आणि पाऊसकर यांनी बेकायदेशीररीत्या भाजपात प्रवेश केल्याबद्दल मगोचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी दुपारी अपात्रता याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ‘मगो’ पक्षाचे भाजपात विलीनीकरण झाले नसल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. भारतीय घटनेच्या परिशिष्ट- 10 नुसार एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश सदस्य दुसर्‍या पक्षात विलिन झाले तर ते कायदेशीर ठरू शकते. मात्र, राज्यात असा प्रकार झालाच नाही, असा मगोचा दावा आहे. पक्षाबरोबर दोन-तृतीयांश आमदारांची संख्याही दुसर्‍या पक्षात विलीन होणे गरजेचे आहे. दोन- तृतीयांश आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला, असा त्याचा अर्थ होत नाही. 

‘मगो’ पक्षाची घटना खूपच सशक्त असून त्यात पक्षाचे अन्य पक्षात विलिनीकरण करायचे असेल तर आमसभेचा त्यासाठी ठराव घ्यावा लागतो. पक्षात फूट पडणे आता शक्य नाही. या आमदारांनी जे केले आहे ते घटनेची थट्टा करण्यासारखे आहे. या आमदारांनी फक्त एक पत्र सभापतींच्या नावे दिले असून त्याआधारे मगो पक्ष विलीन झाला असल्याचा दावा केला आहे. या पत्राच्या आधारे दोघांनाही मंत्रिपद आणि महत्वाची खाती मिळाली आहेत. मगोचे विलिनीकरण झाला असल्याचा या दोघा आमदारांचा दावाच खोटा आहे. विलिनीकरण म्हणजे जुन्या पक्षासह आमदारांची दोन-तृतीयांश संख्या दुसर्‍या पक्षात जाणे आवश्यक असून या प्रकारात तसे काही घडलेच नाही, असे दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

गोव्यात परतल्यानंतरच नोटिसा ः लोबो

 हंगामी सभापती मायकल लोबो म्हणाले की, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आजगावकर आणि पाऊसकर या दोघा आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केली आहे. सदर याचिका अपात्रता कायद्यानुसार दाखल करण्यात आली आहे. त्यावर आपण अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेणार आहोत. मात्र, आपण शनिवारपासून (दि.4 ) दहा दिवसांच्या सुट्टीसाठी दौर्‍यावर जात असून आपण राज्यात परतल्यानंतरच नोटिसा पाठवणार आहे.