Thu, May 28, 2020 06:19होमपेज › Goa › परवानगी मिळताच गोवेकरांची खरेदीसाठी तोबा गर्दी

परवानगी मिळताच गोवेकरांची खरेदीसाठी तोबा गर्दी

Last Updated: Mar 27 2020 1:04PM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी किराणा दुकाने खुली ठेवण्याची घोषणा केली आणि शुक्रवारी पहाटेपासून दक्षिण गोव्यातील बाजारपेठेत लोकांची झुंबड दिसून आली. मास्क नाही की सोशियल डिस्ट्न्सिंग नाही. जीवाची पर्वा न करता महिनाभरापासून उपाशी असल्यागत लोकांनी सामानाची खरेदी केली. मुख्यमंत्र्यांनी दुकाने खुली ठेवण्याचे जाहीर केल्यानंतर काहींनी समाधान व्यक्त केले तरी काही मंडळींनी रात्रीपासूनच मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी आपला निर्णय मागे घ्यावी अशी मागणी करण्यास सुरवात केलेली होती. सध्या ऑनलाइन याचिकांचा ट्रेंड असल्याने काहींनी मुख्यमंत्र्यांशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाही तयार केलेली आहे आणि आतापर्यंत यास सुमारे दीड लाख लोकांनी पाठिंबा दिलेला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लोकांच्या हितासाठीच २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. लोकांना जीवनाश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे मात्र लोकांकडे संयम नाही. 'जान सलामत तर पगडी पचास' अशी प्रसिद्ध म्हण आहे मात्र लोकांना अजूनही याचे महत्व समजलेले नाही. इटलीत कोरोनामुळे मृत लोकांच्या वाढत्या आकड्याचे भीषण सत्यही लोकांना गर्दी करण्यापासून रोखलेले नाही. लोकांना आपण व आपल्या परिवाराच्या जिवापेक्षा अजूनही खाण्याची वस्तू महत्त्वाच्या वाटतात ही सत्यस्थिती आहे अशा परखड प्रतिक्रिया सोशियल मीडियावरून व्यक्त होत आहेत.

जगण्यासाठी जीवनाश्यक वस्तूंची गरज असते हे मान्य आहे. मात्र, सध्या गोव्यातही पोचलेल्या या महामारीपासून स्वतःचे रक्षण करणेही तितकेच गरजेचे आहे. काहींनी सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात बंड पुकारलेले आहे तर काही लोकांच्या बेजबाबदार वागणुकीचा निषेध करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी किराणा दुकाने खुली ठेवण्याचे जाहीर करताना अनेक वेळा गर्दी न करण्याचे आवाहन करूनही लोकांनी कुठलीही तमा न बाळगता आज खरेदी केली.

कुठल्याही दुकानावर जाताना एका मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक असूनही लोकांनी एकमेकांना चिकटून रांगांच्या रांगा करून सामानांची खरेदी केली. काही गर्दी केलेल्या ठिकाणी पोलिसांनी फटकरण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी पोलिसानाही ऐकवल्याशिवाय सोडले नाही. कोरोनाव्हायरस हा संक्रमित होणारा रोग असूनही लोकांनी बाजारात खरेदी करताना स्वतःची काळजी घेतली नाही. लोकांनी किराणा वस्तूबरोबर आपले मरणही विकत घेतलेले आहे असेही काहींनी म्हटलेले आहे.

गुरुवारी रात्रीपासून अनेक जबाबदार मंडळींनी लोकांना बाजारात न जाण्याचे आणि सामान घरपोच करणाऱ्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते, तरीही लोकांनी बाजारात गर्दी करून आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचा जीवही धोक्यात घातल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सरकारने बंदी काळातही किराणा, भाजीची अशी जीवनाश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्याची आवश्यकता होती. सुरवातीपासूनच सरकारने ही दुकाने अपवाद ठेवली असती तर लोकांमध्ये एवढा गोंधळ माजला नसता. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर आज बाजारात लोकांनी गर्दी केलेली आहे. लोकांना यापुढे दुकाने उघडी मिळतील की नाही याची शाश्वती नाही म्हणून लोकांनी जीवाची पर्वाही बाळगता स्वतःच्या परिवारासाठी वस्तूंची खरेददारी करण्यास सुरवात केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य जाहीर केलेले आहे मात्र दुकाने अशी खुली राहतील असे समजले असते तर लोकही एकाच दिवशी गर्दी न करता निवांत राहिले असते. आज बाजारात काहीच ठिकाणी १ मिटरचे अंतर तसेच लोकाद्वारे मास्क वापरण्यात येत आहे 
- शिक्षिका सरिता नाईक - दवर्ली मडगाव

कोरोनाव्हायरस हा संक्रमित रोग असूनही लोकांनी बाजारात गर्दी करून मुर्खपणाचा कळस गाठलेला आहे. सरकारने जीवनाश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी मागितला होता, मात्र लोकांनी दोन दिवसही संयम बाळगला नाही. चायना इटलीसारख्या देशात याच रोगामुळे हजारो लाखो जणांचा बळी गेला. गोव्यातही नुकतेच तीन रुग्ण सापडलेले आहे तरीही लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे वाटत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जर लोकांनाच आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याचे पडलेले नाही तर १०० टक्के लॉकडाऊन करून लोकांच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारलाही काही म्हणण्यास त्यांना अधिकार नाही.
- स्थानिक रौनक घाडी - काकोडा, कुडचडे