Wed, Jul 08, 2020 14:15होमपेज › Goa › पणजीतील हल्लाप्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

पणजीतील हल्लाप्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

Published On: Jun 30 2019 1:07AM | Last Updated: Jun 30 2019 1:07AM
पणजी : प्रतिनिधी

पाटो पणजी येथील डाऊन द रोड पब नजीक 2014 साली झालेल्या हल्‍लाप्रकरणी आरोपी झेन आल्मेदा याला पणजीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर राफेल डा कॉस्टा या पीडित व्यक्‍तीला 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या हल्ल्याप्रकरणी 25 जून रोजी न्यायालयाने आल्मेदा याला दोषी ठरवले होते.

पीडित व्यक्‍तीला जीवघेण्या हत्यारांव्दारे जखमी केल्याचा ठपका न्यायालयाने आरोपी आल्मेदा याच्यावर ठेवला आहे. सदर हल्‍ला प्रकरण हे एप्रिल 2014 मध्ये ईस्टरच्या मध्यरात्री घडले होते. आरोपी झेन आल्मेदा (म्हापसा) तसेच पीडित राजू सरीन व राफेल डा कॉस्टा (दोघे पणजी) हे तिघे डाऊन द रोड या पबमध्ये ईस्टर पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या तिघांमध्ये कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला व आल्मेदा याने सरीन तसेच कॉस्टा यांच्यावर तलवारीने हल्‍ला केला. या हल्ल्यात सरीन व कॉस्टा हे दोघे गंभीर झाले. पैकी एकट्यावर डोळा गमावण्याची वेळ आली.

या घटनेचे पणजीत तीव्र पडसाद उमटल्यानंतर आल्मेदा याला पणजी पोलिसांनी त्वरीत अटक केली होती. त्याचबरोबर आल्मेदा याला कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय द्यावा या मागणीसाठी पणजीवासियांनी निषेध सभेचेदेखील आयोजन केले होते. या प्रकरणातील आरोपीला तब्बल पाच वर्षांनी पणजी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.