Wed, Jul 08, 2020 12:50होमपेज › Goa › शेतकर्‍यांकडून दूध स्वीकारण्याचे ‘सुमूल’ला आदेश

शेतकर्‍यांकडून दूध स्वीकारण्याचे ‘सुमूल’ला आदेश

Published On: Jul 17 2019 2:05AM | Last Updated: Jul 16 2019 11:57PM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांचे दूध स्वीकारण्यास नकार दिल्याप्रकरणी ‘सुमूल डेअरी’च्या अधिकार्‍यांशी आपण मंगळवारी चर्चा केली आहे. राज्यातील शेतकर्‍यांचे दूध स्वीकारण्याचा आदेश आपण ‘सुमूल’ला दिला असून स्थानिक शेतकर्‍यांची समस्या दूर झाली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

साळ आणि डिचोली भागातील शेतकर्‍यांनी दिलेले दूध फॅट कमी असल्याचे कारण देऊन ‘सुमूल’च्या अधिकार्‍यांनी ते स्वीकारण्यास सोमवारी नकार दिला होता. या प्रकरणी शेतकर्‍यांनी पर्वरी येथील रस्त्यावर हजारो लिटर दूध ओतून सुमूलचा निषेध केला होता. हे प्रकरण मुख्यमंत्री सावंत यांनी गांभिर्याने घेऊन ‘सुमूल’च्या अधिकार्‍यांना मंगळवारी चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, शेतकर्‍यांनी आपल्या गाईंना रोगराईपासून बचावासाठी दिलेल्या इंजेक्शनमधून ‘अँटीबायोटीक्स’ गेल्याने ‘सुमूल’च्या कर्मचार्‍यांनी डिचोली, साळ येथील शेतकर्‍यांनी आणलेले दूध स्वीकारण्यास नकार दिला होता. या प्रकरणी ‘सुमूल’च्या सरव्यवस्थापकांना आपण बुधवारी चर्चेसाठी बोलावले असून सध्या कोणत्याही शेतकर्‍यांचे दूध नाकारू नये, असा आदेश दिला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी आपले दूध ‘सुमूल’ला देणे सुरू ठेवावे.

‘सुमूल’चे स्थानिक व्यवस्थापक उत्पल दवे यांनीही या माहितीला दुजोरा देऊन सांगितले की, केवळ गैरसमजुतीमुळे शेतकर्‍यांनी सोमवारी निर्दशने केली. केंद्रीय ‘एफएसएसएआय’ संस्थेने दिलेल्या निर्देशांनुसार, शेतकर्‍यांकडून मिळालेल्या 

सर्व दुधाचे शास्त्रीय परीक्षण करण्यासाठी नवे यंत्र आले असून ते शेतकर्‍यांकडे उपलब्ध नाही.गाई वितात तेव्हा अनेक शेतकरी गाईंना ‘अँटीबायोटीक्स’चे इंजेक्शन देतात. याशिवाय, अन्य काही औषधेही दिली जाण्याची शक्यता असते. या यंत्रात औषधाचा अंश शेतकर्‍यांनी दिलेल्या दुधात सापडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते दूध नाकारण्यात आले. सदर दुधाचे नमुने आम्ही खासगी प्रयोगशाळेतही पाठवले असून त्याच्या अहवालाची वाट पाहत आहोत. मात्र, शेतकर्‍यांना दूध देताना काळजी घेण्यास सांगितले असून दूध स्वीकारण्यास पुन्हा सुरवात करण्यात आली आहे.