Fri, May 29, 2020 23:12होमपेज › Goa › प्रेमसंबंधातून बोरीत युवतीचा खून

प्रेमसंबंधातून बोरीत युवतीचा खून

Last Updated: Apr 18 2020 12:57AM

संशयित मन्सूर हुसेन शेखफोंडा : पुढारी वृत्तसेवा

आपल्याशी संबंध तोडून दुसर्‍याशी सूत जुळवल्याच्या रागातून संतापलेल्या युवकाने युवतीचे अपहरण करून नंतर गळा आवळून खून केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी संशयित मन्सूर हुसेन शेख (वय 21) या युवकाला फोंडा पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले. संशयिताने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ नेपाळी पण सध्या मेस्तवाडा - कुर्टी फोंडा येथे राहणार्‍या सतरावर्षीय युवतीचे अपहरण करून बायथाखोल - बोरी येथील डोंगरावरील पाण्याच्या टाकीजवळील पंपहाऊसच्या खोलीत नेवून तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी बाबल्याखळी- नागझर कुर्टी फोंडा येथील मन्सूर हुसेन शेख याला अटक केली. संशयित मन्सूर शेख याने खुनाची कबुली दिली आहे. त्याला भा.दं.सं. कलम 363, गोवा बालहक्क कायदा कलम 8 व 302 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. संशयित मन्सूर हा फोंडा मार्केटमध्ये चप्पल विक्रीचा व्यवसाय करतो. खून झालेली ही युवती गेल्या सोमवारी 13 एप्रिलपासून बेपत्ता होती. फोंडा पोलिसांत याप्रकरणी गुरुवारी 16 एप्रिल रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती.

मृत अल्पवयीन युवती आणि मन्सूर शेख यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना पसंत नव्हते. त्यामुळे तिचे अन्यत्र लग्न करण्याचा निर्णय नेपाळी कुटुंबीयांनी घेतला होता. संशयित मन्सूर व या युवतीचे बिनसले होते, त्यामुळेही मन्सूर अस्वस्थ होता. दरम्यानच्या काळात तिचे अन्य एकाशी सूत जुळले. त्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णयही तिने घेतला. ही माहिती कळताच मन्सूर शेख संतप्त झाला होता.

दरम्यान, या युवतीला कुत्रा चावला होता, त्यासाठी ती फोंडा आयडी इस्पितळात उपचार घेत होती. या उपचारातील शेवटचे इंजेक्शन गेल्या सोमवारी होते, ते घेण्यासाठी ती फोंड्यात आली होती. त्यावेळी मन्सूरने तिच्याशी संपर्क साधला व काही बोलायचे आहे म्हणून तिला तो बायथाखोल-बोरी येथील डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ जीए05 एच 7125 या क्रमांकाच्या स्कूटरने घेऊन गेला. 

खून करण्यापूर्वी या युवतीला मन्सूरने निर्मनुष्य असलेल्या टाकीच्या पंपहाऊस खोलीत नेले. तेथे या दोघांची बाचाबाची झाली असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर मन्सूरने युवतीचा गळा आवळला, त्यातच ती गतप्राण झाली. तिचा मृतदेह खोलीतील एका लाकडी बॉक्सवर उताणा पडला होता. खून करून शांतपणे मन्सूर घरी परतला, पण कुणाकडेच वाच्यता केली नाही. 

काजू गोळा करण्यासाठी येथील काही लोक शुक्रवारी सकाळी रानात या ठिकाणी गेले असता, पाण्याच्या टाकीजवळील खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे दिसल्याने त्यांनी दरवाजा ढकलला असता, आत एका युवतीचा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी लगेच गावात येऊन याबाबत माहिती दिली व नंतर फोंडा पोलिसांना कळवण्यात आले. 

याची माहिती मिळाल्यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी पोलिस उपअधीक्षक नेल्सन आल्बूकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी तपास केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते, रवींद्र देसाई तसेच उपनिरीक्षक सूरज काणकोणकर, सहायक उपनिरीक्षक सुभाष नाईक, कॉन्स्टेबल गोरखनाथ गावस, अविनाश नाईक, गुणा दमेकर, केदार जल्मी, संदीप नाईक, कल्पेश खोलकर, अमय गोसावी व वंदेश सतरकर यांच्या पथकाने तपासकामात सहकार्य केले. खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद गावस तसेच पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य यांनी फोंड्यात येऊन तपासकामाचा आढावा घेतला व तपास अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य यांनी केवळ दहा तासांत तपास लावल्याबद्दल फोंडा पोलिस तपास पथकाला पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे. खुनाचा तपास लावल्याबद्दल फोंड्याचे पोलिस निरीक्षक मोहन गावडे तसेच तपास पथकातील अन्य सर्व पोलिस अधिकारी व कॉन्स्टेबलचे अभिनंदन करण्यात येत आहे.    

ओळख पटल्याने तपासाला वेग!

खून झालेल्या युवतीची ओळख पटल्याने या खुनाचा तपास वेगाने लागला. युवतीची माहिती तिच्या कुटुंबीयांकडून तसेच अन्य मित्रांकडून घेण्यात आली. त्यावेळेला मन्सूरचे नाव समोर आले. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले, तसेच मोबाईल कनेक्शन व इतर बाबी जुळून आल्यानंतर मन्सूरला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. रागाच्या भरात आपण खून केल्याचे मन्सूरने मान्य केले आहे.