Wed, Jul 08, 2020 12:11होमपेज › Goa › केरये येथे जलवाहिनी जोडण्याचे काम वेगात

केरये येथे जलवाहिनी जोडण्याचे काम वेगात

Published On: Aug 20 2019 1:45AM | Last Updated: Aug 20 2019 1:48AM
फोंडा : प्रतिनिधी

केरये-खांडेपार येथील फुटलेल्या जलवाहिनी जोडणीचे काम जोरात सुरू असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर ठाम असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

केरये येथील जलवाहिन्या फुटल्याने राजधानी पणजीसह तिसवाडी तालुका व फोंडा तालुक्यातील काही भागात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी या लोकांना वणवण करावी लागत असून गेले चार दिवस जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. 

जलवाहिनी दुरुस्तीसाठी सिमेंट काँक्रीटचा चौथरा उभारण्यात आला असून त्यावर या जलवाहिन्या जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणार्‍या साहित्याची जोडणी करण्यासाठी मडकई औद्योगिक वसाहतीतील एका प्रकल्पात तसेच कुर्टी येथील गॅरेजमध्ये ते काम देण्यात आले होते. सोमवारी रात्री हे साहित्य केरये येथे पोचल्यानंतर रात्री जोडणीचे काम सुरू करण्यात आले. या कामावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केरये येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. शक्य तेवढ्या लवकर पाणी पुरवठा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही जलवाहिनी बदलण्यासंबंधीची कार्यवाही गेल्या जानेवारी महिन्यातच झाली होती, मात्र निवडणूक तसेच इतर कारणांमुळे हे काम रखडले. आता दुरुस्तीनंतर कायमस्वरुपी ही जलवाहिनी बदलण्याची कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी सांगितले. 

‘पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेचा विचार’

केरये-खांडेपार येथील जलवाहिन्या फुटल्यामुळे तिसवाडी आणि फोंडा भागातील खंडित झालेला पाणीपुरवठा मंगळवार संध्याकाळपर्यंत पूर्ववत होणार आहे. पावसाने उसंत घेतल्यास मंगळवारी दुपारपर्यंत नव्या जलवाहिन्या बसवण्याचे काम पूर्ण होणार आहे. यात 900 मि.मी. व्यासाची जलवाहिनी बसवण्याला प्राधान्य देण्यात येणार असून ओपाहून सोडलेले पाणी पणजीपर्यंत पोहोचण्यास तीन तास पुरेसे आहेत. त्यामुळे पणजी व आसपासच्या भागांना मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. मात्र, मुख्य जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारामुळे पूर्ण तालुक्यात पाण्याची समस्या जटील झाली असल्याचे दिसत असल्याने प्रत्येक तालुक्याला पर्यायी जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले.