Sun, May 31, 2020 15:11होमपेज › Goa › निवडणुकीतून माघारीचा शब्द दीपक ढवळीकरांनी फिरवला 

निवडणुकीतून माघारीचा शब्द दीपक ढवळीकरांनी फिरवला 

Published On: Mar 26 2019 1:33AM | Last Updated: Mar 26 2019 12:14AM
पणजी : प्रतिनिधी

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी भाजपचे केंद्रीय नेते तथा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आपण शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगितले होते. आता दीपक ढवळीकरांनी पुन्हा जोमाने प्रचाराला सुरुवात केली असल्याची माहिती पुराव्यासहीत केंद्रीय नेत्यांना कळवण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी येथील भाजप मुख्यालयात सोमवारी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तेंडुलकर म्हणाले की, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर राज्याचे मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना भेटण्यासाठी मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आले होते. त्यावेळी गडकरी यांनी शिरोडा पोटनिवडणुकीचा विषय काढून दीपक यांना उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली. त्यावर सुदिन यांनी आपल्या फोनवरून दीपक ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला. गडकरी यांनी मगोने युती पक्षाचा धर्म पाळला पाहिजे, शिरोडा पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करू नये, अशी विनंती दीपक यांना केली होती. दीपक ढवळीकर यांनी ही विनंती मान्य केली होती. या घटनेला आपण, संघटनमंत्री सतीश धोंड, सचिव बी. एल. संतोष आणि प्रभारी पुराणीक आदी साक्षीदार होतो. 

दीपक ढवळीकर यांनी ही विनंती न मानता पुन्हा रविवारपासून (दि. 24) प्रचाराला सुरवात केली असल्याचे आपल्याला समजले आहे. त्या एका रात्रीनंतर दीपक ढवळीकर यांच्यात काय मतपरिवर्तन झाले, ते आपल्याला समजले नाही. मात्र, तरीही युती धर्माचे पालन करून दीपक शिरोडा मतदारसंघातून माघार घेणार, असा आपल्याला विश्‍वास असल्याचे तेंडुलकर म्हणाले. निवडणूक लढवण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. सुधीर कांदोळकर हेही मागील अनेक वर्षे भाजपचे चांगले कार्यकर्ते होते. म्हापसा पोटनिवडणुकीत सुधीर कांदोळकर आमच्याबरोबर असायला हवे होते. मात्र, त्यांनी अचानक काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल दुख: वाटत असल्याचे  तेंडुलकर यांनी सांगितले.