Thu, Jul 02, 2020 13:57होमपेज › Goa › संप मागे घ्या, तोडगा काढू :  मुख्यमंत्री

संप मागे घ्या, तोडगा काढू :  मुख्यमंत्री

Published On: Aug 03 2019 1:03AM | Last Updated: Aug 03 2019 1:03AM
पणजी : प्रतिनिधी

खासगी टॅक्सी चालकांनी आपला संप मागे घ्यावा आणि आठ दिवसांत स्वतंत्र अ‍ॅप तयार करावे. त्यांना अ‍ॅप तयार करण्याबाबत कसलीही गरज पडल्यास ‘आयटी’ खाते मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. 

राज्यातील खासगी टॅक्सी चालकांनी सरकारची ‘गोवा माईल्स’ सेवा बंद करावी, या मागणीसाठी शुक्रवारी अचानकपणे संप घोषित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी येथे विधानसभेत आले असता मुख्यमंत्री सावंत पत्रकारांशी बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, खासगी टॅक्सी चालकांनी कारण नसताना संपावर जाऊन आपल्या व्यवसायाचे नुकसान करू नये. राज्यातील टॅक्सी चालकांचा व्यवसाय वाढावा आणि तो व्यवसाय भविष्यातही चांगला चालावा, अशी सरकारची इच्छा आहे. गोव्याच्या आणि गोमंतकीयांच्या हितासाठी सरकारने ‘गोवा माईल्स’ सेवेच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटक आणि जनतेची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तसेच टॅक्सी व्यवसायाच्या वृद्धीसाठीही अ‍ॅप सेवा महत्वाची आहे. टॅक्सीवाल्यांनी तात्पुरता फायदा न बघता लांब पल्ल्याचा विचार करावा. 

खासगी टॅक्सी चालकांपैकी काही जणांना गोवा माईल्स सेवेत सामील व्हायचे असेल तर त्यांनी जरूर यावे. गोवा माईल्सबद्दल अनेक टॅक्सीवाल्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. गोवा माईल्स हे पर्यटन विकास महामंडळाचे कंत्राटदार आहेत. ते आपल्या फायद्यातील वाटा जीटीडीसीलाही देत आहेत. त्यांचा संचालकानेही खासगी टॅक्सी चालकांना सेवेत सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे. 

ते म्हणाले की, सरकारने सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवलेली असताना खासगी टॅक्सी चालकांनी संपावर जाण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी संप मागे घ्यावा आणि सरकारकडे बोलणी करण्यास पुढे यावे. खासगी टॅक्सी चालकांसाठी वेगळा अ‍ॅप करणे, या अ‍ॅपला प्रसिद्धी देणे हे सर्व सरकार करू शकते. जर त्यांच्याकडे अ‍ॅप तयार करू शकणारा एखादा ऑपरेटर असेल तर, त्यालाही सरकारकडून पूर्ण मदत द्यायची सरकारची तयारी आहे.