Tue, May 26, 2020 08:39होमपेज › Goa › आम्हाला कामकाज बंद पाडायचे नव्हते : कवळेकर

आम्हाला कामकाज बंद पाडायचे नव्हते : कवळेकर

Published On: Jul 20 2018 1:15AM | Last Updated: Jul 20 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

विधानसभेचे कामकाज आम्हाला बंद पाडायचे नव्हते. फार्मेलिनयुक्‍त मासळी हा विषय केवळ विरोधी पक्षातील 16 आमदारांपुरताच मर्यादित नसून संपूर्ण गोमंतकीयांचा आहे. विरोध करायला हवा म्हणून तो करायचा, असा आमचा मुळीच उद्देश नव्हता किंवा ‘कामकाज चालूच द्यायचे नाही’ असे आधीच नियोजनही करून आम्ही आलो नव्हतो, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिले.

विधानसभेत गुरुवारी फार्मेलिनयुक्‍त मासळी विषयावर विरोधकांनी घातलेल्या गोंधळानंतर सभापती प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाचे कामकाज शुक्रवारी (दि.20)  सकाळी 11.30 पर्यंत तहकूब केले. त्यानंतर कवळेकरांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

मानवी आरोग्यासंबंधीच्या गंभीर  विषयावर चर्चा होणे ही काळाची गरज आहे. सरकारने स्वत:च्या जिद्दीवर न अडता फार्मेलिनयुक्‍त मासळी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या विषयाला प्राधान्य द्यावे. सरकारने गुरुवारचा  दिवस जसा वाया घालवला, तसा शुक्रवारही वाया जाऊ नये व या विषयावर तोडगा काढावा,  असे कवळेकर म्हणाले.