Thu, May 28, 2020 05:52होमपेज › Goa › सुदिन ढवळीकरांमुळेच मंत्रिपदापासून वंचित

सुदिन ढवळीकरांमुळेच मंत्रिपदापासून वंचित

Published On: Mar 21 2019 12:57AM | Last Updated: Mar 21 2019 12:57AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे तीन मंत्रिपदे आणि तीन महामंडळे मिळावीत, या मागणीसंदर्भात दिलेले पत्र सुदिन ढवळीकर यांनी त्यांना सादर केलेच नाही. यामुळे आपण मंत्रिपदाला वंचित राहिलो, अशी खंत मगोचे आमदार दीपक पाऊसकर यांनी बुधवारी पत्रकारांकडे व्यक्त केली. त्यामुळे भाजप आघाडी सरकारचा घटकपक्ष असलेल्या मगो नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी असल्याचे उघड झाले आहे. 

पाऊसकर म्हणाले की, मगोच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीने सोमवारी घेतलेल्या बैठकीत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काही अटी घातल्या होत्या. या अटींमध्ये मगोच्या तिन्ही आमदारांना मंत्रिपद देणे तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना तीन महामंडळे देण्याबाबतचा एकमताने घेतलेला ठराव होता. हे पत्र केंद्रीय मंत्री तथा भाजपचे निरीक्षक नितीन गडकरी यांना देण्यासाठी 

सुदिन ढवळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते. मात्र, सुदिन यांनी शेवटपर्यंत सदर पत्र भाजप नेत्यांकडे सूपूर्द केलेच नसल्याचे उघड झाल्याने आपण आणि मनोहर आजगावकर सोमवारी उशिरा रात्री गडकरी यांना पुन्हा भेटण्यासाठी गेलो होतो. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ‘मगो’चे सदर पत्र मिळालेच नसल्याचे उघड केल्याने मंत्रिमंडळात फक्त दोनच जागा ‘मगो’ला देणे शक्य असल्याचे सांगितल्याने आपली घोर निराशा झाली, असे पाऊसकर म्हणाले. 

पाऊसकर म्हणाले की, सुदिन ढवळीकर हे सोमवारी रात्री कुठेच भेटत नव्हते. तसेच त्यांच्याशी फोनवरही संपर्क होऊ शकला नव्हता. सुदिन ढवळीकर यांच्याकडे ‘मगो’च्या कार्यकारिणीचे पत्र तसेच राहिले होते. आता मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्याने त्याबाबतीत तक्रार करण्यात अर्थ नाही. मात्र, या घटनेमुळे ‘मगो’चे आपण आणि आजगावकर हे दोन आमदार भाजपात प्रवेश करायला गेले असल्याची अफवा पसरली.