Wed, May 27, 2020 11:11होमपेज › Goa › राज्यात आज मतदान

राज्यात आज मतदान

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 23 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि विधानसभेच्या म्हापसा, मांद्रे व शिरोडा या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. लोकसभेसाठी 12 व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या 16 मिळून 28 उमेदवारांचे भवितव्य 1652 मतदान केंद्रांतील ‘ईव्हीएम’ यंत्रांत बंद होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्तात ‘ईव्हीएम’ यंत्रे सुरक्षितपणे विविध मतदान केंद्रांवर नेण्यात आली.
लोकसभेच्या दोन जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात उत्तर गोवा व दक्षिण गोव्यातील प्रत्येकी सहा उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह विद्यमान खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर या भाजप उमेदवारांचे भवितव्य आज सीलबंद होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन हे यावेळी लोकसभेसाठी 

आपले भवितव्य आजमावित आहेत. यांच्याव्यतिरिक्त आप (2), शिवसेना (1), आरपीआय (1), अपक्ष (4) उमेदवार मतदारांचा कौल आजमावत आहेत.विधानसभेच्या तीन मतदारसंघांत होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी 16 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या शिरोडा पोटनिवडणुकीत सुभाष शिरोडकर (भाजप), दीपक ढवळीकर (मगोप), महादेव नाईक (काँग्रेस) या माजी मंत्र्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे.

म्हापशात माजी मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा, ऐनवेळी काँग्रेसमध्ये सामील झालेले सुधीर कांदोळकर यांच्यासह 7 जणांचे आणि मांद्रे मतदारसंघात भाजपात अलिकडेच सामील झालेले दयानंद सोपटे व काँग्रेसचे निष्ठावंत बाबी बागकर यांच्यासह गोसुमंचे स्वरूप नाईक व अपक्ष जीत आरोलकर यांचे भवितव्य सीलबंद होणार आहे. म्हापशात 7, शिरोड्यात 5 व मांद्रेतून 4 उमेदवारांचा समावेश आहे. 

राज्यात एकूण 1652 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून उत्तर गोव्यात 5 आणि दक्षिण गोव्यात 21 मिळून 26 केंद्रे संवेदनशील आहेत. उत्तर गोव्यात 14 व दक्षिण गोव्यात 7, अशी 21 केंद्रे अतिसंवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. 

राज्यात एकूण 11 लाख 35 हजार 811 मतदार आहेत. यात 5.55 लाख पुरूष आणि 5.80 लाख महिला मतदारांचा यात 3473 सेवेतील कर्मचार्‍यांना टपाल मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी एकूण 9275 कर्मचारी नेमण्यात आले असून 3231 पोलिस कर्मचारीही सामील आहेत.

राज्यात 7474 इतके दिव्यांग मतदार आहेत. दक्षिण गोव्यातील 3263 तर उत्तर गोव्यातील 4211 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात अंधूक द‍ृष्टी अथवा नेत्रहिन असे 288 तर उत्तर गोव्यात 385 मतदार आहेत. तर दक्षिण गोव्यात 314 व उत्तर गोव्यात 385 मूकबधीर मतदार आहेत.

दिव्यांग मतदारांना ‘व्हील चेअर’, ‘मॅग्निफाईंग ग्लासेस’, ‘ब्रेल ईव्हीएम’ अशा विविध बाबींची मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून सुविधा पुरविण्यात आली आहे. 
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कामासाठी गोवा पोलिस खात्याचे सुमारे 5 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय सीआरपीएफ, सीमा सुरक्षा दल, केरळ पोलिसांच्या सात तुकड्या धरून 12 सशस्त्र दले राज्यात दाखल झाली आहेत. 

लोकसभा तसेच पोटनिवडणुकीसाठी मागील एका महिन्यापासून सुरू असलेला जाहीर प्रचार 21 एप्रिल रोजी संपुष्टात आला. सोमवारी संध्याकाळपर्यंत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला होता.