Mon, May 25, 2020 09:49होमपेज › Goa › अधिकार्‍यांच्या बेपर्वाईचा बळी

अधिकार्‍यांच्या बेपर्वाईचा बळी

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 1:07AMमडगाव : विशाल नाईक 

दूधसागर नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना कोणत्याही सुरक्षेशिवाय पर्यटकांना हजारो रुपये घेऊन बेकायदेशीरपणे दूधसागर धबधब्यावर पाठवणारी टोळी कुळेत सक्रिय झाली आहे. ही टोळी   रेल्वे पोलिसांशी हातमिळवणी करून पर्यटकांना रेल्वेतून दूधसागर धबधब्यावर पाठवून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे वृत्त ‘पुढारी’तून प्रसिद्ध होऊनही संबंधित अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी सहाजण वाहून जाण्याची दुर्घटना घडली. तरी केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्यातील पाच जणांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले.

दूधसागर धबधबा एरव्ही देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी वर्षभर आकर्षणाचे केंद्र ठरतो. उन्हाळ्यात पर्यटकांबरोबर ट्रेकिंगसाठी दूधसागर वरदान ठरतो. पण पावसात मात्र दूधसागर रौद्ररूप धारण करत असल्याने कुळेतून नदी ओलांडून दूधसागर धबधब्यावर जाणे धाडसाचे असते. त्यामुळे यावेळी वनपाल परेश पोरोब यांनी 31 मे रोजीच पर्यटकांना दूधसागर धबधब्यावर घेऊन जाणार्‍या स्थानिकांच्या जीप गाड्यांवर बंदी आणली होती. सध्या सुमारे 375 जीप गाड्यांना या बंदीचा फटका बसला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, तेलंगणा व इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात येणार्‍या पर्यटकांना या बंदीबद्दल माहिती नसल्याने दर दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक कर्नाटकातून थेट मोलेत उतरल्यानंतर कुळेत दाखल होत आहेत. पण कुळेत आल्यानंतर त्यांना दूधसागरावर जाण्यास बंदी असल्याचे समजताच त्यांची निराशा होत आहे. याचा फायदा कुळेत सक्रिय झालेली टोळी घेत आहे.

सुमारे दहा जणांची एक टोळी असून त्यांच्याकडून  पर्यटकांना रेल्वेत बसवून दूधसागरावर पाठवले जात आहे.पर्यटकांना थेट मालवाहू रेल्वे गाडीत बसवून सोनाळी रेल्वे स्थानकावर उतरवले जाते आणि सोनाळी येथे उतरून त्यांना दूधसागर धबधब्यापर्यंत नेले जाते. सोनाळीवरून दूधसागर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक ओहोळ लागतो. पावसात ओहोळाचे पाणी वाढत असल्याने पर्यटकांना जीव मुठीत धरून जावे लागते. सध्या अनेक लोक ट्रेकिंगसाठी रेल्वेमार्गावरून जात आहेत. रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आलेले पर्यटक कोणालाही विश्‍वासात न घेता बोगस दलालांच्या माध्यमातून कॅसलरॉक येथे जाणार्‍या मालगाडीतून प्रवास करत सोनाळी येथे जात आहेत. या प्रकारातून रविवारी ही घटना घडली आहे.

रेल्वे पोलिस, स्थानिक दलाल आणि मालगाडी रेल्वेचा चालक आदींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हरीचंद्र गावकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की,  शनिवारी आणि रविवारी कुळेत पर्यटकांची गर्दी असते. पण दूधसागरावर जाण्यासाठी अन्य मार्ग नसल्याने पर्यटक थेट येथील दलालांना गाठतात. दलालांचे आणि रेल्वे पोलिसांचे साटेलोटे असल्याने दलाल एका पर्यटकामागे दीड ते दोन हजार रुपये आकारून रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीने रेल्वेत बसवून सोनाळीत उतरवतात. गेल्यावेळी पावसात एका महिलेला रेल्वेत चढताना अपघात होऊन पाय गमावावा लागला होता. संबंधित अधिकार्‍यांनी त्या अपघाताकडे दुर्लक्ष केल्याने यावेळी पुन्हा पर्यटक वाहून जाण्याची घटना घडली आहे.