Wed, Jul 08, 2020 12:06होमपेज › Goa › कोडलीतून वेदांताची खनिज वाहतूक सुरू

कोडलीतून वेदांताची खनिज वाहतूक सुरू

Last Updated: Nov 13 2019 1:06AM
फोंडा : प्रतिनिधी 
बराच काळ रेंगाळत पडलेली कोडली-दाभाळ येथील सेझाच्या वेदांता खाण कंपनीच्या खनिज मालाची वाहतूक अखेर सोमवारी (दि.11) सुरू झाली. गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली खनिज मालाची वाहतूक आज-उद्या करीत बंदच होती. सेझाच्या या खनिज माल वाहतुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक प्रश्‍न उपस्थित झाल्याने ही वाहतूक रखडली होती. सोमवारी 250 खनिजवाहू टिप्पर कोडलीहून आमोणेकडे रवाना झाले.

दरम्यान, या खनिज वाहतुकीमुळे ट्रकमालकांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी लिलावाचा माल कमी असल्याने ट्रकवाल्यांना मर्यादित काम मिळणार आहे. सेझा वेदांताच्या कोडली ते आमोणापर्यंत ही खनिज माल वाहतूक होणार आहे. सरकारने केलेल्या लिलावातून सेझाच्या वेदांता कंपनीने हा खनिज माल घेतला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात दक्षिण गोव्यात पाच दशलक्ष टन खनिज मालाचा लिलाव करण्यात आला होता. त्यातीलच हा खनिज माल आहे.

लिलावात माल घेतला असला तरी वाहतुकीसाठी आवश्यक परवाने नसल्याने खनिज वाहतूक लांबणीवर पडली होती. त्यातच ट्रकमालक व कामगारांचा प्रश्‍नही समोर आला होता. मात्र, या लिलावाच्या खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवाने नसल्याने हा माल पडून होता. उशिरा परवाने मिळाले तरी कंपनीसमोरील वाहतुकीच्या अडचणी वाढल्या होत्या. लिलावाचा माल किती आहे आणि काम किती मिळणार यासंबंधीची माहिती आधी द्या, नंतरच खनिज वाहतूक करू, असे ट्रकमालकांनी सांगितल्याने आणि घरी बसवलेल्या कंपनीच्या कामगारांना आधी कामावर घ्या, अशीही मागणी समोर आल्याने खनिज मालाची वाहतूक अडून होती. सद्यस्थितीत या मागण्यांवर कंपनी व्यवस्थापनाने तोडगा काढल्याची माहिती देण्यात आली.

सोमवारी सकाळी सुमारे अडिचशे टिप्पर ट्रक खनिज वाहतुकीसाठी तयार झाले होते. या ट्रकांतून ही वाहतूक अखेर सुरू झाली. खनिज मालाची वाहतूक करताना सरकारने घातलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच वाहतूक करावी, असे आवाहन वेदांता कंपनीने ट्रकमालकांना केले आहे. कंपनीने एकूण 130 कामगारांना कामावर रूजू करून घेतले असून दाभाळ तसेच अन्य भागातील कामगारांना सोमवारपर्यंत अदलीबदली पद्धतीने कामावर सामावून घेण्यात येणार आहे. याप्रकरणी कोडली पंचायतीचे उपसरपंच शशिकांत गावकर तसेच इतर पंचायत सदस्य व सावर्डे पंचायतीचे सरपंच संदीप पाऊसकर व इतरांनी कंपनीच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले.