Thu, Jul 02, 2020 14:54होमपेज › Goa › आरोग्य अधिकार्‍यांच्या राजीनाम्याची मागणी

‘डेंग्यू’संदर्भात वास्कोवासीयांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: Aug 20 2019 1:45AM | Last Updated: Aug 20 2019 1:45AM
दाबोळी ः प्रतिनिधी

डेंग्यूमुळे दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी तसेच वास्कोतील सुमारे दोनशे रहिवाशांनी सोमवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच आरोग्य खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन आरोग्य खात्याच्या डॉ. रश्मी खांडेपारकर व डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सरकारी नोकरीतून पायउतार व्हावे, अशी मागणी केली. चिघळलेल्या वातावरणात वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसांत वास्कोत दोन रुग्णांचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला. तसेच आणखी संशयित रुग्णांत वाढ होत चालल्याने वास्को शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य खात्याच्या वास्कोतील अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा ठपका मोर्चात सहभागी रहिवाशांनी ठेवला. चिखली उपजिल्हा इस्पितळाचे डॉ. राजेंद्र बोरकर तसेच डॉ. रश्मी खांडेपारकर यांच्यावर त्यांनी ठपका ठेवला. डेंग्यूवर नियंत्रण आणणे जमत नसेल, तर सरकारी जावई बनून राहू नका, नोकरीवरुन पायउतार व्हा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, त्यांनी या विषयावर तातडीची बैठक घेतली. बैठकीत उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई, आमदार कार्लूस आल्मेदा, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, नगराध्यक्ष नंदादीप राऊत, डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. रश्मी खांडेपारकर तसेच दीपक नाईक, फेड्रीक हेन्रिक्स, लविना डिसोझा, दाजी साळकर, यतिन कामुर्लेकर हे नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूमुळे दोन रुग्ण दगावल्यासंबंधी चर्चा झाली. याविषयी चिखली इस्पितळाचे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले की, चिखली उपजिल्हा इस्पितळात साधन सुविधांच्या अभावांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. इथे खाटा कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. या इस्पितळात रूग्ण तपासणीसाठीची उपकरणेही पुरेशा प्रमाणात नसल्याने रोगाचे योग्य निदान करु शकत नसल्याचे ते म्हणाले. कामगार वर्ग व डॉक्टरांची कमतरता असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. रश्मी बोरकर यांनी गेल्या पाच वर्षांत वास्को शहरात डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याचे मान्य केले. गेल्या जून, जुलै महिन्यात सडा, खारीवाडा, नवेवाडे, वाडे भागात संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्याचे डॉ. रश्मी खांडेपार यांनी सांगितले. 11 व 14 ऑगस्ट रोजी दोन रूग्ण डेंग्यूमुळे दगावल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, डॉ. बोरकर व डॉ. खांडेपारकर यांच्या विधानावर जमलेल्या रहिवाशांनी नाराजी व्यक्‍त करून चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात डॉक्टर निष्काळजीपणा करतात, उडवाउडवीची उत्तरे देतात, नर्स झोपलेल्या असतात, औषधे मिळत नाहीत. तसेच डॉ. बोरकर व डॉ. रश्मी खांडेपारकर यांचे योग्य सहकार्य मिळत नाही, असे सांगितले.

येथील सेंट अँड्यू्रू चर्चचे फा. गाब्रियल कुतिन्हो यांनी सांगितले की, सरकार 370 घटनेचे कलम रद्द करु शकते तर रुग्णांना योग्य साधन सुविधा असलेले इस्पितळ का देऊ शकत नाही? चिखली उपजिल्हा इस्पितळ उभारणीसाठी जनतेचा पैसा खर्च केला आहे. योग्य सुविधा मिळत नसल्यास या इस्पितळाचा काय लाभ, असा सवाल करून असलेल्या डॉक्टरांनी सरकारी जावई होऊन राहण्यापेक्षा काम सोडून घरी बसावे, असेही ते म्हणाले.

येत्या दहा दिवसांत चिखलीचे उपजिल्हा इस्पितळ पूर्ण साधनसुविधांनीयुक्त करावे अन्यथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी वास्कोत येऊन इस्पितळाबाबत तसेच येथील डॉक्टरांच्या चाललेल्या भोंगळ कारभाराविषयी जाब द्यावा, असा इशारा मोर्चेकर्‍यांनी दिला. आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर व डॉ. रश्मी बोरकर यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.