Mon, May 25, 2020 09:47होमपेज › Goa › ‘इफ्फी’च्या नावाने वायफळ खर्च

‘इफ्फी’च्या नावाने वायफळ खर्च

Published On: Nov 24 2018 1:21AM | Last Updated: Nov 23 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

इफ्फीत  यंदा गोमंतकीय महिला स्वयंसहाय्य गटांना स्टॉल्स घालण्याची परवानगी नाकारुन त्यांच्यावर  अन्याय करण्यात आला आहे.  इफ्फीच्या नावाने वायफळ खर्च  केला जात असून त्याचा दर्जा खालावत असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अमरनाथ पणजीकर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत केली. 

गोवा मनोरंजन संस्थेच्या काही अधिकार्‍यांकडून मनमानी केली जात आहे. आपल्याला हव्या त्या गोष्टी ते करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पणजीकर म्हणाले, की इफ्फीची उमेद कमी होत आहे.  इफ्फीत दरवर्षी गोमंतकीय महिला स्वयंसहाय्य गटांकडून  स्टॉल्स घालून पारंपरिक जेवण उपलब्ध केले जायचे. मात्र, यंदा इफ्फी परिसरात स्टॉल्स  घालण्यास परवानगी नाकारण्यात आली असून त्यांना फुटबॉल मैदान व  जॉगर्स पार्क येथे स्टॉल्स घाला असे सांगण्यात आले. तर अन्य कंपन्यांचे स्टॉल्स इफ्फी परिसरात उभारण्यात  आल्याची टीका त्यांनी केली. 

यावरुन इफ्फीत गोमंतकीयांचा  स्वाभिमान विकण्याचा प्रकार असल्याचे सिध्द होते. इफ्फीसाठी देण्यात आलेले विमान तिकीट कंत्राट, वाहतूक  कंत्राट तसेच  हॉटेल्सच्या कंत्राट भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

 संजीवनी साखर कारखाना बंद  करण्याचा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. या कारखान्यावर जवळपास 1200 ऊस उत्पादक शेतकरी अवलंबून असून कारखाना बंद झाल्यास त्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कारखाना बंद होऊ नये यासाठी   सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही पणजीकर यांनी केली.

 यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते उर्फान मुल्‍ला, विशाल वळवईकर,  जनार्दन भंडारी,  सचिन परब, शेख अली, दिनेश  कुबल आदी उपस्थित होते.
रेती उपसाला परवानगी द्यावी

रेती माफियांमुळे  राज्यात  रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. 3 हजार रुपयांना मिळणार्‍या रेतीच्या ट्रकासाठी  आता 35 हजार रुपये मोजावे लागत असल्याचा आरोप उर्फान मुल्‍ला यांनी केला. खाण खात्याकडे रेती उपसासाठी परवानगी मिळावी म्हणून  300 जणांनी अर्ज केले आहेत. मात्र, हे सर्व अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहे. खात्याकडून या अर्जांवर त्वरित प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणीही त्यांनी केली.