Thu, May 28, 2020 07:28होमपेज › Goa › पणजी मनपा महापौरपदी उदय मडकईकर 

पणजी मनपा महापौरपदी उदय मडकईकर 

Published On: Mar 14 2019 12:54PM | Last Updated: Mar 14 2019 12:54PM
पणजी : प्रतिनिधी

पणजी मनपा महापौरपदी बाबूश मोन्सेरात गटाचे उदय मडकईकर तर उपमहापौरपदी पास्कॉला  मास्कारेन्हस यांची  बिनविरोधात निवड झाली. मनपा आयुक्‍त शशांक त्रिपाठी यांनी  गुरुवारी याबाबत घोषण केली.

पणजी मनपा सभागृहात आयोजित विशेष बैठकीत ही घोषणा करण्यात आली. मात्र,  यावेळी  विरोधी भाजप गटाच्या सर्व नगरसेवकांनी अनुपस्थित राहून बहिष्कार घातला. यावेळी मडकईकर यांचे समर्थक मोठया संख्येने सभागृहात हजर होते. मडकईकर व मास्कारेन्हस यांच्या नावांची घोषणा करताच समर्थकांनी मनपा समोर फटाके उडवून आनंद साजरा केला.

पणजी मनपाच्या महापौर व उपमहापौरपदासाठी  अनुक्रमे मडकईकर व मास्कारेन्हस यांनीच अर्ज सादर केल्याने  त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा आयुक्‍त त्रिपाठी यांनी  केली. मडकईकर यांच्या नियुक्‍तीने मनपावर सलग चौथ्या  वर्षी  मोन्सेरात गटाचा झेंडा फडकला आहे.

मनपाचे नवनियुक्‍त महापौर मडकईकर यांनी यावेळी पणजी शहरातील स्वच्छतेला  विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर  शहराच्या स्वच्छते संदर्भात लवकरच सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली जाणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

स्वच्छेबाबत पणजीचे मानांकन घसरुन  ३५६ इतके झाले आहे. ही बाब गंभीर असून  नक्‍की काय चुकले याचा विचार करणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी हा प्रकल्प राबवताना मनपाला विश्‍वासात घेण्यात आले नाही. मात्र असे असले तरी मनपाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. सर्वांना विश्‍वासात घेऊन काम केले जाईल असा विश्वास त्‍यांनी यावेळी व्यक्‍त केला. 

विरोधी भाजप गटाने  महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आमची बिनविरोध निवड झाली. यासाठी त्यांचे आभार आहेत. मात्र त्यांनी या विशेष बैठकीवर बहिष्कार घातल्याने चुकीचा संदेश गेला आहे. बाबूश मोन्सेरात यांनी आपल्याला  महापौरपद बहाल केल्याने त्यांचे आभार आहेत. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवला जाईल असेही मडकईकर यांनी यावेळी सांगितले.