Thu, Jul 02, 2020 15:01होमपेज › Goa › दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

Published On: Jul 30 2019 1:36AM | Last Updated: Jul 30 2019 1:36AM
मडगाव : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलांचा वापर करून गोव्यासह कर्नाटक राज्यातून दुचाकी चोरणार्‍या आठ जणांच्या टोळीच्या वेर्णा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आठ जणांमध्ये चौदा ते सोळा वयोगटातील सहा अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. संशयितांकडून पोलिसांनी पाच महागड्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत तर सुमारे दहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोर्‍या फोंडा, म्हापसा, वेर्णा आणि बेळगाव येथे घडल्या होत्या. सविस्तर माहितीनुसार सुमारे वीस जणांची ही टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात महागड्या दुचाकी चोरी करण्यात कार्यरत होती. दक्षिण गोव्यातील दुचाकी चोरून उत्तर गोव्यात आणि उत्तर गोव्यातील दुचाकी चोरून दक्षिण गोव्यात विकण्याचे काम करत होते. लोकांना संशय येऊ नये यासाठी अल्पवयीन मुलांचा या टोळीत समावेश करण्यात आला होता. या टोळीने बेळगाव येथूनसुद्धा दुचाकी चोरल्या होत्या. यापूर्वी अशाच स्वरूपाच्या तक्रारी या टोळीतील काही सदस्यांच्या विरोधात आल्या होत्या. अनेकवेळा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. राज्यात दुचाकी चोरीच्या प्रकरणांत वाढ झाल्यानंतर वेर्णा पोलिसांनी या टोळीवर लक्ष केंद्रीत केले होते. रविवारी उशिरा पोलिसांनी वरील सर्वांना ताब्यात घेतले. सुरज कोकाटे आणि क्लिव कोस्ताना या वेळ्ळी आणि कुडतरी येथील दोन युवकांना ताब्यात घेतल्याची माहीती पोलिस निरीक्षक चोडणकर यांनी दिली आहे.

पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 4.7 लाख रुपये किमतीच्या या दुचाकी आहेत. सर्व सहाही अल्पवयीन मुलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. संशयितांनी वेर्णा येथून दोन, फोंडा येथून एक, म्हापसा येथून एक आणि बेळगावातून एक अशा पाच दुचाकी चोरल्या होत्या, अशी माहिती निरीक्षक चोडणकर यांनी दिली. या टोळीतील अन्य सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. इतर संशयित हाती आल्यास आणखी प्रकरणांचा उलगडा होऊ शकतो, असे चोडणकर म्हणाले.

म्होरक्याही अल्पवयीनच...

सुमारे वीस जणांच्या टोळीचा म्होरक्या एक अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोडणकर यांनी दिली. या म्होरक्याच्या नेतृत्वाखाली वरील टोळके दुचाकी चोरण्याचे काम करत होते. सर्व अल्पवयीन मूळ गोव्यातील असून, त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. या अल्पवयीन मुलांनी आतापर्यंत अनेक गाड्या चोरलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.