Wed, May 27, 2020 05:24होमपेज › Goa › दुचाकीस्वाराला मारहाण, उपनिरीक्षकाची बदली

दुचाकीस्वाराला मारहाण, उपनिरीक्षकाची बदली

Last Updated: Mar 22 2020 11:14PM
मडगाव ः पुढारी वृत्तसेवा

कर्फ्यू लागू असताना हौसिंग बोर्ड येथे दुचाकीवरून येणार्‍या एकाला लाठीने जबर मारहाण करणार्‍या उपनिरिक्षक तेजस नाईक यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची दखल घेऊन दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक अरविंद गावस यांनी त्यांची राखीव विभागात बदली केली असून खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मायणा कुडतरी पोलिस स्थानकात उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या तेजस नाईक याला जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तासाठी संवेदनशील भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या हौसिंग बोर्ड येथे तैनात करण्यात आले होते.तेजस आपल्या पोलिस वाहनांबरोबर अंजुमन स्कूल जवळ ड्युटी करत असताना अचानक एक पांढर्‍या रंगाची अ‍ॅक्टिव्हा घेऊन एकजण अंजुमन स्कूलच्या दिशेने आला. तेजस नाईक आणि अन्य एका पोलिसाने त्याला अडवून कुठे जात आहेस, अशी विचारणा केली. त्याने दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने तेजस नाईक यांनी त्याला दुचाकीवरून उतरू न देता लाठीने त्याला झोडपण्यास सुरू केले. नियमाप्रमाणे कंबरेच्या वर लाठीने मारता येत नाही, पण तेजस यांनी त्याच्या हातावर आणि पाठीवर लाठीने जोरदार मारहाण करण्यास सुरू केले.

सदर व्यक्तीने माफी मागून आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला, पण तेजस नाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा प्रकार समोरच्या इमारतीत राहणार्‍या लोकांनी पाहून त्याचे चित्रीकरण करून ते व्हायरल केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिस सध्या टीकेचे धनी बनले आहेत. या प्रकाराची दखल घेऊन दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी तात्काळ उपनिरीक्षक तेजस नाईक यांची हौसिंग बोर्डमधील ड्युटी काढून राखीव विभागात त्यांची बदली केली आहे. गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस नाईक यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे.