Thu, May 28, 2020 06:46होमपेज › Goa › वेर्णा, फातोर्डा येथे दोन ठार

वेर्णा, फातोर्डा येथे दोन ठार

Last Updated: Feb 09 2020 1:18AM
वास्को/मडगाव : पुढारी वृत्तसेवा 

फातोर्डा आणि वेर्णा येथे शनिवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जण ठार झाले. बोर्डा-फातोर्डा येथे अपघातात बाबलो गोलतेकर (वय 56, शिवोली) हा आणि  वेर्णा येथे अपघातात जॉनेता डिसोझा (60 कुठ्ठाळी) या ठार झाल्या तर जॉन डिसोझा हा जखमी झाला आहे.  वेर्णा टायटन चौकापासून काही अंतरावर शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात जॉनेता डिसोझा ही महिला जागीच ठार झाली. या अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी ट्रकचालक रतनलाल सुतार (राजस्थान) याला ताब्यात घेतले. मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात पाठविला आहे. 

जॉनेता डिसोझा ही शनिवारी सकाळी आपल्या पतीसह दुचाकीने कुठ्ठाळीहून वेर्णाकडे जात होती.  वेर्णा टायटन चौकापासून काही अंतरावर पोहोचल्यावर पतीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने मागे बसलेल्या  जॉनेता अचानकपणे घसरून स्कूटरवरून रस्त्यावर कोसळल्या. यावेळी तेथून जाणार्‍या अवजड सामानवाहू ट्रकच्या चाकाखाली ती सापडली. रस्त्यावर पडलेल्या डिसोझा  ट्रकचालकाच्या नजरेस येईपर्यंत त्या ट्रकसह  काही अंतरावर फटफटत गेल्या.

यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्या जागीच ठार झाल्या.  वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.  जॉनेता डिसोझा या एमपीटीच्या कर्मचारी असून त्यांची जीएडी विभागातून या महिन्यात वाहतूक विभागामध्ये ऑफिस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक झाली होती. पुढील वर्षी त्या निवृत्त होणार होत्या. फातोर्डा येथे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी यांची धडक झाली. या अपघातात बाबलो गोलतेकर  रस्त्यावर फेकला गेला व गंभीर  जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचे निधन झाले.