Thu, Jul 02, 2020 15:57होमपेज › Goa › हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात अडीच लाखांचा गुटखा जप्त 

हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात अडीच लाखांचा गुटखा जप्त 

Published On: Jun 22 2019 1:03AM | Last Updated: Jun 22 2019 1:03AM
म्हापसा : प्रतिनिधी

हडफडे-नागवा पंचायतीतर्फे शुक्रवारी सकाळी अचानक तंबाखूजन्य पदार्थ विक्री विरोधात खास मोहीम राबवून पंचायत क्षेत्रातील 30 दुकानांवर कारवाई करण्यात आली. एकूण अडीच लाखांचा गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिली. 

राज्यात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची शाळा, महाविद्यालयांच्या आवारात विक्री करण्यावर बंदी असतानाही सर्रासपणे शाळा, महाविद्यालय परिसरात विक्री सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात सापडल्याचे उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले. यावर त्वरित नियंत्रण न आणल्यास याचे दूरगामी दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. किनारपट्टी भागात परप्रांतीय कामगार व मजूर मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. ही मंडळी या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. मात्र, हळूहळू आता स्थानिक लोक व खास करून विद्यार्थीसुद्धा गुटख्याच्या आहारी गेल्याचे आढळत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हडफडे-नागवा पंचायतीची तंबाखूजन्य पदार्थ विरोधी मोहीम स्तुत्य आहे, असेही लोबो म्हणाले. 

कळंगुट, पर्रा व कांदोळी पंचायत क्षेत्रातही अशाचप्रकारे अचानकपणे भेट देऊन तंबाखूजन्य व अन्य निषिध्द पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानांची पाहणी केली जाईल. त्याचप्रमाणे गोव्यातील सर्व पंचायतींनी अचानकपणे छापे टाकून कारवाई करण्याची गरज असल्याचे लोबो यांनी सांगितले. 

दरम्यान, पंचायतीने जप्त केलेला माल परत करावा यासाठी संबंधित दुकानदार पंचायत सदस्यांना दहा हजारांची लाच देण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोप माजी सरंपच आगुस्तिन डिसोझा यांनी केला.