होमपेज › Goa › ‘अटलसेतू’वरील वाहतूक खड्ड्यामुळे अडीच तास बंद

‘अटलसेतू’वरील वाहतूक खड्ड्यामुळे अडीच तास बंद

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 1:41AM
पणजी :  प्रतिनिधी

मांडवीवरील ‘अटलसेतू’वर पर्वरीच्या दिशेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतल्यामुळे पुलावरील वाहतूक  बुधवारी  दुुपारी 1 ते 3.30 पर्यंत अडीच तास बंद ठेवली होती. त्यामुळे वाहतूक मांडवीवरील अन्य पुलावर वळविण्यात आली  होती, अशी माहिती  पणजी वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांनी दिली.

मांडवीवरील तिसर्‍या पुलाचे अर्थात अटलसेतूचे  उद्घाटन जानेवारी महिन्यात झाले होते. सर्वात उंच पूल अशी या पुलाची ख्याती आहे. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यांतच या पुलाचा रस्ता काहीसा खचल्याने  वाहनचालकांनी नाराजी व्यक्‍त केली होती.

अटल सेतूचा रस्ता खचल्याचे फोटो  व्हायरल झाल्यानंतर हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी  हे काम तातडीने हाती घेतले  होते.  पर्वरीच्या दिशेने  म्हणजेच जिथून वाहने खाली उतरतात, तेथे   रस्ता खचला होता. त्यामुळे   दुपारी 1 ते 3.30 वाजण्याच्या सुमारे अडीच तास दुरूस्तीकाम  हाती घेतले  होते.

अटल सेतू या पुलाचे बांधकाम एल अ‍ॅण्ड टी या कंपनी करीत आहे. या पुलाचे उद्घाटन झाले असले तरी  प्रत्यक्षात अजूनही या पुलाचे काम बाकी आहे.  या पुलामुळे म्हापशाहून   मडगावला जाणारी वाहतूक पणजी शहरात येण्याऐवजी मेरशी मार्गे जात आहे. त्यामुळे जुन्या मांडवी पुलावर होणारी  वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र पुलावर खड्डा पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.