Tue, May 26, 2020 07:47होमपेज › Goa › फर्मागुढी किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या करणार विकास 

फर्मागुढी किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या करणार विकास 

Last Updated: Feb 20 2020 2:41AM
फोंडा ः पुढारी वृत्तसेवा
फर्मागुढीतील शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच पर्यटनद‍ृष्ट्या विकास करण्यासाठी या किल्ल्याचे पुनर्बांधकाम केले जाईल. येत्या वर्षभरात या कामाची पायाभरणी केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. शिवाजी महाराज हे आदर्श लोकनेते होते. त्यांनी स्वराज्य स्थापून रयतेला सुराज्य दिले. त्यांचा आदर्श आज प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

फर्मागुढी  येथे बुधवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या शासकीय  सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, फोंड्याचे आमदार रवी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार तसेच संचालक मेघना शेटगावकर व प्रमुख वक्‍ते डॉ. पद्माकर गोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

सकाळी फर्मागुढी किल्ल्यावरील अश्‍वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुलांकडून लेझीम सादर करण्यात आले. महिला पथकाकडून सुरेख ढोल ताशावादन झाले. मुलांनी पोवाडाही यावेळी सादर केला. 

गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या शामियान्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की, फर्मागुढीच्या विद्यमान किल्ल्याला शिवकालीन स्वरूपप्राप्त करून देताना शिवाजी महाराज तसेच हिंदवी स्वराज्यासंबंधीचे ऐतिहासिक दस्तावेज या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या वास्तूच्या दालनात ठेवण्यात येतील, त्यामुळे मुलांना इतिहासाचे महत्त्व पटेल, आणि शिवाजी महाराजांचा आदर्श समजू शकेल. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रमाणे प्रत्येक राज्य हे सुराज्य होणे शक्य आहे, पण त्यासाठी लोकांनीही सरकारला आवश्यक सहकार्य द्यायला हवे, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

मंत्री गोविंद गावडे म्हणाले,की शिवाजी महाराजांनी जात, धर्म पंथ बाजूला सारून   सुराज्य निर्माण केले. त्यांचे जीवन व कार्य   सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. 

स्वागत व प्रास्ताविक माहिती खात्याच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी केले. सूत्रसंचालन गिरिश वेळगेकर व माहिती खात्याचे अधिकारी प्रकाश नाईक यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय माहिती खात्याचे सहायक अधिकारी शांतो नाईक यांनी करून दिला. त्यानंतर मुलांचा शिवाजी महाराजांवरील आधारित कार्यक्रम तसेच स्पर्धा झाल्या. रात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.