Tue, May 26, 2020 05:42होमपेज › Goa › मोदींची आज बांबोळीत सभा

मोदींची आज बांबोळीत सभा

Published On: Apr 10 2019 1:54AM | Last Updated: Apr 10 2019 1:35AM
पणजी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि.10) संध्याकाळी 4 वा. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असून त्याकरिता सुमारे 25 हजारहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी मिळून बांबोळीत एकच सभा घेतली जाणार असून त्यासाठी सभागृह तसेच बाहेरील मंडपात मिळून सात ठिकाणी भव्य स्क्रीन्स लावण्याची तयारी करण्यात आली आहे, असे भाजप  प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले. 

स्टेडियमवरील सभेची तयारी मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होती. या सभेची तयारी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून ते  आपल्या सहकार्‍यांसह गेले दोन दिवस येथे तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांनी मंगळवारी संध्याकाळी आयोजनस्थळी भेट देऊन पाहणी केली. 

राज्यात उकाडा वाढला असल्याने खुल्या मैदानाऐवजी बंद वातानुकूलित सभागृहात सभा घेण्याचे ठरविण्यात आले आहे.  स्टेडियममध्ये खालच्या आणि वरच्या दोन्ही  गॅलरीमध्ये मिळून सुमारे 14 हजार लोक बसतील, अशी सोय करण्यात आली आहे.   स्टेडियमच्या बाहेरच्या बाजूला तीन मोठे मंडप उभारण्यात आले असून तेथे आणखी 10 ते 11 हजार लोकांची सोय करण्यात येणार आहे. तीन सभागृहांच्या मागच्या बाजूला एक भव्य स्क्रीन तर बाहेरील मंडपात चार मोठे स्क्रीन लावण्यात आले असल्याचे कुंकळ्येकर यांनी सांगितले. मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बैठका घेण्यात आल्या आहेत. सर्व चाळीसही  मतदारसंघांतून प्रत्येकी हजार ते दीड हजार कार्यकर्ते येणार आहेत. तसेच गोव्याच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार, मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी, प्रभूंच्या सभा

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू राज्यात प्रचाराला येणार असून ते एकाच दिवशी चार ठिकाणी जाहीर सभांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. गडकरी येत्या 17 एप्रिल रोजी संध्याकाळी मांद्रे, हळदोणे, म्हापसा आणि कळंगुट  भागातील जाहीर सभेला उपस्थित राहून मतदारांकडे संवाद साधणार आहेत. तर, केंद्रीय  मंत्री  प्रभू हेही येत्या 16 एप्रिल रोजी पर्वरी, फोंडा, पेडणे आणि फातोर्डा शहरातील जाहीर सभांमध्ये  हजर राहणार आहेत.