Tue, Sep 17, 2019 04:08होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी अध्यादेश प्रक्रियेला गती देण्याची अमित शहांची सूचना

खाणप्रश्‍नी अध्यादेश प्रक्रियेला गती देण्याची अमित शहांची सूचना

Published On: Nov 03 2018 1:28AM | Last Updated: Nov 05 2018 1:24AMपणजी /डिचोली ः प्रतिनिधी 

केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गोव्यातील खाणींचा प्रश्‍न तातडीने निकालात काढण्यासाठी आगामी लोकसभा अधिवेशनात अध्यादेश जारी करण्याबाबत तयारी करण्याच्या सूचना केंद्रीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यासाठी केंद्रीय खाण कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्याच्या  सूचना शहा यांनी दिल्या असून, खाणी सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रीय कायदा विभागाकडून मंजुरी आली की लागलीच उर्वरित प्रक्रिया  पूर्ण करण्यात येईल, अशी हमी केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती सभापती तथा साखळीचे आमदार  डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी दिल्लीत भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.  भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर आणि सभापती डॉ. सावंत यांचा शिष्टमंडळात समावेश होता. आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि वीज मंत्री नीलेश काब्राल हेही शहा यांना भेटण्यासाठी गुरूवारी दिल्‍लीस गेले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते राज्यात परतल्याचे सूत्रांनी सांगितले.

खासदार सावईकर यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदीच्या आदेशानंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत शहा यांना शुक्रवारी माहिती देण्यात आली. या संकटावर संसदीय मार्गाने तोडगा काढण्यासाठी केंद्रीय ‘एमएमडीआर’ कायद्यातच दुरूस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र तोमर  यांनीही राज्यातील खाण उद्योग पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे  सावईकर यांनी सांगितले. 

राज्यातील खाणी सुरू होणे गरजेचे असून यासाठी भाजप सरकार केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. सतत पंतप्रधान कार्यालय,   केंद्रीय  मंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  अमित शहा यांना याबाबत सतत कल्पना दिलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही गोव्याचा हा महत्वाचा  विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून खाणी सुरु करण्याची प्रक्रिया  गतिमान करून सर्व बाबी तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री तोमर व राष्ट्रीय अध्यक्ष  अमित  शहा यांनी दिले आहे, असे  डॉ. प्रमोद  सावंत यांनी सांगितले.

‘खाण अवलंबितांना लवकरच दिलासा’

खाण अवलंबितांसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेक योजना आखून त्यांचा भार हलका केलेला आहे. कर्ज व इतर बाबतीत दिलासा दिला आहे. मात्र, विरोधकांनी खाणबंदीबाबत भाजपला दोष देण्याचा निरर्थक प्रयत्न केला आहे. आज केंद्र सरकारकडून ठोस आश्‍वासन मिळाले असून खाणी सुरू करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्वच स्तरावर चर्चा झाली आहे. लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होऊन खाण अवलंबितांना दिलासा मिळेल, अशी खात्री सावंत यांनी व्यक्‍तकेली.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex