Wed, May 27, 2020 04:13होमपेज › Goa › भाजप, काँग्रेस, मगोचा शिरोड्यात प्रचारावर जोर

भाजप, काँग्रेस, मगोचा शिरोड्यात प्रचारावर जोर

Published On: Apr 09 2019 1:56AM | Last Updated: Apr 09 2019 1:45AM
फोंडा : प्रतिनिधी

शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून हरिश्‍चंद्र सुधाकर नाईक यांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतल्याने आता या मतदारसंघात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, मगो आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सद्यस्थितीत शिरोडा मतदारसंघात काँग्रेस, मगो आणि भाजप अशा तीन पक्षात  प्रामुख्याने लढत अपेक्षित असून तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी शिरोडा मतदारसंघात जोरदार प्रचार चालवला आहे.  गोवा सुरक्षा मंच, आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचाही आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार सुरू असून मतदारांशी थेट संपर्कावर त्यांनी भर दिला आहे. 

शिरोडा मतदारसंघात काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष शिरोडकर यांनी राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात आमदारकीची जागा रिक्त झाली होती. सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात उडी घेतल्यानंतर या मतदारसंघात राजकारण ढवळून निघाले होते. दोनवेळा निवडून येऊनही गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी होऊ न शकलेल्या माजी मंत्री महादेव नाईक यांना काँग्रेस पक्षाने जवळ केल्यानंतर शिरोड्याच्या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. तर त्यापूर्वीच मगो पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री दीपक ढवळीकर यांनी आव्हान  देत सर्वांच्या अगोदर प्रचाराला सुरवात केली होती. त्यामुळे शिरोडा मतदारसंघात या तीन पक्षात चुरस निर्माण झाली होती. 

उमेदवारी दाखल केल्यानंतर मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यासाठी भाजप व डेमोक्रेटिक लेबर पार्टीच्या उमेदवारांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र दीपक ढवळीकर यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरल्यानंतर मगो कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून शिरोडा मतदारसंघात प्रचारावेळी वाढणारी मतदारांची गर्दी वाढू लागली आहे. 

काँग्रेस पक्षाचे उमेदवार महादेव नाईक यांचा मतदारांशी दांडगा संपर्क आहे. आपल्या दोन कार्यकाळात महादेव नाईक यांनी विकासकामांचा धडाका लावला होता. विशेषतः शिरोड्यातील इस्पितळाची उभारणी महत्त्वाची ठरल्याने मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याकडेही महादेव नाईक यांनी आपला कल ठेवला होता. महादेव नाईक यांना डावलून भाजपने सुभाष शिरोडकर यांना उमेदवारी दिल्यानंतर साहजिकच भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता, मात्र नंतरच्या काळात झालेल्या घडामोडीत भाजपचे बहुतांश कार्यकर्ते सुभाष शिरोडकर यांचा प्रचार करण्यास तयार झाले. त्यामुळे महादेव नाईक यांना केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे हितचिंतक यांच्यावरच भिस्त ठेवावी लागली. तरीपण महादेव नाईक यांचा शिरोडा मतदारसंघात जोरकस प्रचार सुरू आहे. 

भाजपमध्ये प्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा ताफाही फार मोठा आहे. प्रचाराच्या वेळेला सुभाष शिरोडकर यांच्याबरोबर कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी असते. काँग्रेसचे तत्कालीन कार्यकर्ते व नंतरचे भाजपचे कार्यकर्ते असा दुहेरी लाभ सुभाष शिरोडकर यांना झाला आहे. त्यामुळे भाजपसाठी शिरोड्यात ही जमेची बाजू असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते सांगतात. 
सध्या काँग्रेस, भाजप आणि मगो या  तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारावर भर दिला असून विकासकामांबरोबरच शिरोडा मतदारसंघातील मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासावर या तिन्ही उमेदवारांनी भर दिला आहे. 

‘सायलंट व्होटर्स’वर भिस्त..!

शिरोडा मतदारसंघात सर्व उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असला तरी सायलंट व्होटर्सवरच सर्व  भिस्त असल्याचे बोलले जाते. मागच्या निवडणुकांचा इतिहास पाहता, काही उमेदवारांच्या प्रचारसभांना भली मोठी गर्दी करूनही भलत्यालाच मतदान करण्याचे प्रकार झाल्यामुळेही निकाल चकीत करणारे लागले होते. त्यामुळे आतासुद्धा उमेदवारांच्या प्रचाराला गर्दी होत असली तरी सायलंट व्होटर्स ज्यांनी आपल्या मनात उमेदवार निवडीविषयी ठाम निर्णय घेतला आहे, अशा सायलंट व्होटर्सवरही शिरोड्यातील निवडणूक निर्भर असल्याच्या दबक्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

फॉरवॉर्ड डेमोक्रेटिक लेबर पक्षाची माघार

मगो पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतलेल्या फॉरवॉर्ड डेमोक्रेटिक लेबर पार्टीचे उमेदवार हरिश्‍चंद्र नाईक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. हरिश्‍चंद्र नाईक हे मूळ मडकई मतदारसंघातील असून त्यांनी शिरोडा मतदारसंघातून जबरदस्त आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते, त्यासाठी उमेदवारीही दाखल केली होती. मात्र दीपक ढवळीकर यांच्या उमेदवारीला घेतलेला आक्षेप फेटाळून लावल्याने आता हरिश्‍चंद्र नाईक यांनीच उमेदवारी मागे घेतल्याने फॉरवॉर्ड डेमोक्रेटिक पार्टीचे आव्हान संपुष्टात आले आहे.