Thu, Jul 02, 2020 15:03होमपेज › Goa › तिस्क-उसगावात बसचे टायर चोरल्या प्रकरणी तिघांना अटक; एक फरारी

तिस्क-उसगावात बसचे टायर चोरल्या प्रकरणी तिघांना अटक; एक फरारी

Published On: May 27 2019 1:33AM | Last Updated: May 27 2019 1:33AM
फोंडा : प्रतिनिधी

तिस्क-उसगाव येथे नव्या कोर्‍या बसचे सहाही टायर डिस्कसह चोरीला जाण्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. पोलिसांनी या चोरीप्रकरणी एलिसन टिपूझ पिकार्डो (वय 26, रा. ओपा - खांडेपार), अशोक दामोदर गावकर (39, रा. साकोर्डा) व चंद्रू बसप्पा हिरेकुरबार ( 29, रा. तिस्क उसगाव) या तिघांना अटक केली असून चौथा संशयित फरारी आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे चोवीस तासांच्या आत चोरटे सापडले, अशी माहिती फोंडा पोलिसांनी दिली. चोरलेल्या सहाही टायरची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे समजते.

चौथा चोरटा पळून गेला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. चोरीसाठी वापरलेला टेम्पो (जीए 05 टी 4757)चोरलेल्या टायरसह ताब्यात घेतला आहे. होंडा येथील एसीजीएल कंपनीतर्फे बांधलेली बस महाराष्ट्रात पाठवण्यात येणार होती. त्यासाठी सिद्धेश्‍वरनगर-तिस्क उसगाव येथील चालक शमीद अली याने शनिवारी बस ताब्यात घेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी रविवारी महाराष्ट्रात नेण्यासाठी आपल्या घरालगतच्या शाळेजवळ कसलये-तिस्क येथे ठेवली होती. रविवारी सकाळी बसचालक गाडी नेण्यासाठी आला असता बसची सहा चाके गायब असल्याचे आढळले. बसचालक शमीदने लगेच संबंधित वाहतूकदाराला कळवून फोंडा पोलिसांना या चोरीची माहिती दिली. ही चोरी रात्री बारानंतर झाली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला.

फोंडा पोलिसांनी या चोरीचा तपास करताना सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता एक टेम्पो चोरीच्या वेळेला त्या भागातून गेल्याचे आढळल्याने पोलिसांनी या टेम्पोचा नंबर घेऊन मालकाचा शोध लावला असता हा टेम्पो तिस्क भागातच आढळला. पोलिसांनी या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या हौद्यात सहाही टायर असल्याचे आढळून आले. 

पोलिसांनी त्यानंतर तिघाही संशयितांना ताब्यात घेतले. चोरीचा तपास पोलिस लावत असल्याचे समजल्यामुळे चौथा संशयित चोरटा पसार झाला. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मंगेश वळवईकर यांनी तसेच सहायक उपनिरीक्षक गणपत पाटील व इतर पोलिसांनी पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून चोरलेले टायर हस्तगत केले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.