Tue, May 26, 2020 07:59होमपेज › Goa › तिसर्‍या जिल्ह्याची लवकरच निर्मिती : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

तिसर्‍या जिल्ह्याची लवकरच निर्मिती : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

Last Updated: Feb 14 2020 11:42PM
धारबांदोडा : पुढारी वृत्तसेवा

राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे. कदाचित पुढच्यावर्षी तिसरा जिल्हा अस्तित्वात येण्याची शक्यता असून त्या जिल्ह्यामध्ये धारबांदोडा तालुक्याचा समावेश असणार आहे. त्यामुळे धारबांदोडा तालुक्याचा विकास जलद गतीने होण्यास मदत होईल. मोले ते अनमोड घाटापर्यंत चौपदरी  राष्ट्रीय महामार्ग होणार असून त्यानंतर खर्‍या अर्थाने धारबांदोडा तालुक्याच्या विकासाची दारे खुली होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

धारबांदोडा तालुक्याच्या प्रशासकीय संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याला ते बोलत होते. येत्या काळात सर्व प्रशासकीय कार्यालये नव्या संकुलात स्थलांतरीत करण्यात येणार असून गोवा सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत आहे. तालुक्याचा दोन प्रकारे विकास करणे शक्य असून, तालुक्यात साधनसुविधा उपलब्ध करून देणे सरकारचे कर्तव्य आहे. तर माणसाचा व्यक्तिगत विकास करणे सरकारच्या हातात नसून त्यात लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

सवार्ंनाच नोकर्‍या देणे शक्य नाही. मात्र सरकार दरबारी असलेल्या योजनांचा लाभ घेऊन तरूण व्यवसाय सुरू करू शकतात, त्याचबरोबर खासगी कंपन्यामध्ये काम करूनही प्रत्येकजण आपला विकास साधू  शकतो, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गांवकर, सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकरी अजित रॉय, कला व सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद खुटकर, संजीवनी प्रशासक दामोदर मोरजकर, धारबांदोडा उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार अवीर हेदे, धारबांदोडा सरपंच स्वाती गांवस, उपसरंपच परेश खुटकर, कुळेचे सरपंच मनिष लांबोर, साकोडा सरपंच जितेंद्र नाईक, मोले सरपंच स्नेहलता नाईक, सावर्डे सरपंच संदिप पाऊसकर, दाभाळचे उपसरपंच शशिकांत गांवकर, कालेचे सरपंच किशोर देसाई आदी उपस्थित होते.

मार्चपर्यंत जास्तीत जास्त सरकारी कार्यालये या संकुलात सुरू व्हावीत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना आदेश दिलेले आहेत. धारबांदोडा येेथे संजीवनी साखर कारखान्याच्या एक लाख चौरस मीटर जागेत ट्रक टर्मिनल तयार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून यात स्थानिकांना रोजगार देण्यात येणार आहे. कुमेरी, अल्वारा आणि वन हक्क कायद्यांतर्गत येणार्‍या जमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हक्कदारांना जमिनीच्या सनदी देण्यात येणार असल्याचे बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी  सांगितले. खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्यात स्थानिकांना व कामावरून कमी केलेल्या कामगारांना सामावून घेण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

रंगकर्मी आपा गावकर, धारबांदोडा महिला शक्ती अभियानांच्या अध्यक्ष तथा कुळे शिगांव पंचायतीच्या पंचसदस्य निशा शिगांवकर, दूधसागर देवस्थानचे सदस्य बाबुराव नाईक, माजी पंचायत सचिव दत्ता नाडकर्णी, धारबांदोडा जिल्हा सदस्य गोविंद गांवकर, सावर्डे जिल्हा सदस्य सुवर्णा तेंडुलकर यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धारबांदोडा पंचायतीच्यावतीने बाजू मांडताना पंचसदस्य विनायक गावस यांनी सांगितले की, संकुलाला पंचायतीचा विरोध नाही मात्र संकुल उभारण्याच्या वेळेला पंचायतीने काही अटी घातल्या होत्या.20 हजार चौ.मी.जागा पंचायतीला देण्यात यावी. तसेच ज्येष्ठ नागरिक वाचनालय व पंचायतीसाठी एक कार्यालय देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. शिवाय स्थानिकाना सुरक्षारक्षक म्हणून संधी द्यावी अशी पंचायतीची मागणी होती. त्याचबरोबर संकुलाच्या बाजुला असलेल्या रहिवाशांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये याची दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. अजित रॉय यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मनोज बर्वे यांनी सूत्रसंचालन व प्रदीप नाईक यांनी आभार  मानले.

संजीवनी साखर कारखाना बंद करावा, की चालू ठेवावा याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. मात्र संजीवनीच्या जागेत नवे प्रकल्प उभारून रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे. वन विभागात पर्यावरणस्नेही प्रकल्प उभारण्याची तयारी असून खाण व्यवसाय सुरू करून सर्वांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल.
-डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री